पांझरा, कान, जामखेली, विरखेली नद्यांच्या उगमक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ
साक्री । अक्कलपाडा प्रकल्प बाधित पुनर्वसित गावांचे शंभर टक्के पुनर्वसन झाल्याने धुळे सिंचन विभागाकडून अक्कलपाडा धरण पुर्ण क्षमतेने भरून जास्तीत जास्त पाणी अडवण्याचा प्रयत्न आहे. साक्री तालुक्यातून वाहणार्या पांझरा, कान, जामखेली, विरखेली (वटखळ) या नद्यांच्या उगमक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने या नदींचे पाणी व साक्री परिसरात पांझरेच्या खोर्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने व नाल्यांद्वारे ते पाणी मुख्य प्रवाहात आल्याने अक्कलपाडा धरणाच्या पातळीत जलद वाढ झाली. धरणातील जलसाठा वाढल्याने ’बॅकवॉटर’ थेट दातर्तीपर्यंत पोहोचले आहे. दातर्ती येथील पांझरा नदीवरिल पुल 18 फुट उंच आहे. येथे सध्या सुमारे 14 फुट पाण्याची खोली असून पुलापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी साडेतीन ते चार फुट अंतर शिल्लक आहे. धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आता पाण्याची पातळी वाढणार नसली तरी 14 -15 फुट खोलीचे पाणी दातर्ती येथे असणार आहे.
पुलावरून कठड्यांना संरक्षक पाईप नसल्याने धोका
18 वर्षापुर्वी बसवलेले संरक्षक पाईप आता राहिले नसल्याने धोका वाढला असल्याचे दातर्ती ग्रामस्थ व या रस्त्याने ये-जा करणार्या वाहनधारकांनी म्हटले आहे. सायंकाळच्या वेळी शाळकरी मुले पुलावर येत असल्याने पुलावरील खांबांना संरक्षक पाईप नसल्याने पुलावर चालतांना किंवा मुलं खेळतांना पाण्यात पडून जिवीताचा धोका वाढला असल्याची भीती सरपंच सदाशिव बागुल यांसह ग्रामस्थांनी व्यक्त केली. मार्च 2017 मध्ये रात्रीच्या अंधारात दोन व्यक्ती या पुलावरून कठड्यांना संरक्षक पाईप नसल्याने खाली पडून जखमी झाले होते. अशी अनपेक्षित घटना घडू नये व पुन्हा कोणाचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी व इकडून वावरणा-या प्रवाशांनी पुलास त्वरित संरक्षक पाईप बसवण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत दातर्तीमार्फत या आशयाचे निवेदन संबंधित अधिकार्यांना दिल्याचे सरपंच सदाशिव बागुल व ग्रामपंचायत रोजगार सेवक योगेश पवार यांनी सांगितले.
नदीकिनारी पिके पाण्याखाली
दरम्यान यंदा पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणावर पाणी अडवले गेल्याने दातर्ती शिवारातील नदीकिनारी असलेल्या शेतांमधील खरिप पिक पाण्याखाली गेले आहे. अनेक विहीरी धरणाच्या पाण्यात हरवल्या आहेत. काही शेतांमध्ये ह्या पाण्याची पातळी 5 फुटांपेक्षा जास्त असल्याने संबंधीत शेतकर्यांना हातातोंडाशी आलेल्या पिकावर पाणी सोडावे लागले आहे. खास धरणाचा फुग पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील व साक्रीचेही नागरिक दातर्तीला येत असतात.