अक्कलपाडा प्रकल्पातील पाण्यात वाढ झाल्याने पिकांचे नुकसान

0

समाधानकारक पाऊस मात्र शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतीत; शेतकर्‍यांचे संपुर्ण शेत गेले पाण्यात

शेतकर्‍यांकडून मदतीची मागणी

धुळे । तालुक्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जलसाठेत वाढ झाली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने पाण्याची समस्या मिटली आहे. मात्र वाढलेल्या पाण्यामुळे गंगापूर तामसवाडी, इच्छापूर, सय्यदनगर येथील अनेक शेतकर्‍यांची उभी पीके पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तामसवाडीची पाणी पुरवठ्याची विहीरीतील पाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेत घुसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. शेतकर्‍यांचे लाखोचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी चिंतीत आहे.

बुडित क्षेत्र दर्शविलेले नाही
दरम्यान तामसवाडी, इच्छापूर, गंगापूर, सय्यदनगर शिवारात कपाशी, डांळिब, आंबा, बाजारी, मका, भुईमूग, कडधान्याची पीके व पाण्याखाली गेलेली पाणी पुरवठ्याच्या विहिरीसह अन्य सिचनांच्या विहरी, शाळा बुडित क्षेत्रात पाटबंधारे विभागाने दर्शविल्या नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधीतांना अजून लाभ दिला गेलेला नाही. इच्छापूर शिवारातील शेत जमीन अद्यापही संपादित केलेली नाही.सय्यदनगर येथील ग्रामस्थांना शासकीय यंत्रनेने बुडित क्षेत्रातून हलवण्याची नोटीस दिली होती.

नुकसान भरपाई मिळावी
नुकसानग्रस्त भागाची पाटबंधारे विभागाच्या अधिका-यानी पाहणी केली असली तरी बुडित न दर्शविल्याने नुकसान भरपाई नवीन भूसपदा कायद्यानुसार देण्यात यावी,धरणात साचलेल्या पाण्याचे डोनद्वारे सर्वेक्षण व्हावे अशी मागणी धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष सुभाष काकुस्ते, अक्कलपाड्याचे सरपंच श्रीराम कर्वे, सय्यदनगरचे गुलाब चव्हाण, तामसवाडीचे निबा अहिरराव, वसमारचे भरत नेरे आदींनी केली आहे.तामसवाडीची पाणी पुरवठ्याच्या विहिर पाण्यात गेल्याने ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुन्हा नुकसानीची शक्यता
अक्कलपाडा प्रकल्पात यंदा पावसामुळे ६० टक्केपेक्षा अधिक जलसाठा आहे. १९ सप्टेंबर अखेर २.७३ टीएमसी पाणी साठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. प्रकल्पाची भक्कमता लक्षात घेत यावर्षी पन्नास टक्के पाणी अडविण्यात आले आहे. दुसरीकडे लघुपाटबंधारे विभागाने ७५ ते ८० टक्के पाणी आडविण्याचे ठरविले आहे.तसे झाले तर धरणालगतच्या काही भागाना पुन्हा नुकसान होण्याची शक्यता आहे.