मुंबई – हेरिटेज फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल कॉन्फरन्स ऑफ हेल्थ अँड वेलनेसच्या राष्ट्रीय परिषदेत इंडियन अकॅडमी ऑफ अक्युपंक्चर सायन्सचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय अक्युपंक्चरतज्ञ डॉ. पुरुषोत्तम भ . लोहिया यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
देशभरातील नामांकित 200 तज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेला गुजरातचे मंत्री राजेंद्र त्रिवेदी उपस्थित होते. अक्युपंक्चर, निसर्गोपचार, योग, कलर थेरपी, सुजोक इत्यादी विविध विनाषौधी उपचारपद्धतींवरील व्याख्यानांचे तसेच चर्चासत्रांचे आयोजन यावेळी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे, विनाऔषध उपचार पद्धती ही मूळ भारतीय असून या चिकित्सापद्धतीला त्यामुळे राजाश्रय मिळेल, असे आश्वासन श्री. त्रिवेदी यांनी दिले.
इंडियन अकॅडमी ऑफ अक्युपंक्चरचे अध्यक्ष डॉ. पु. भ. लोहिया यांनी गुजरात राज्यात अक्युपंक्चर कौन्सिल स्थापन करण्यात यावे, अशी मागणी केली. त्याला मंत्रिमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. डॉ. जितेंद्र भट (पिरॅमिड थेरपी), अशोक कोठारी (सुजोक), डॉ. पुरुषोत्तम लोहिया (अक्युपंक्चर), मोदी (योगा), रेशमा सूर्यवंशी (पीसीओडी) आदी वक्त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. हेरिटेज फाऊंडेशनच्या वतीने निलेश व रेश्मा सूर्यवंशी यांनी सर्वांचे स्वागत केले तर फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.