नवी दिल्ली-सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमार यांच्या ‘२.०’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याची चर्चा होत आहे. कारण हा सर्वांत महागडा तब्बल ४५० कोटी रुपये बजेट असलेला चित्रपट आहे. ज्यामध्ये अक्षय खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दुबईमध्ये मोठ्या कार्यक्रमात त्याचा म्युझिक लाँच पार पडण्यात आला. मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनात बऱ्याच अडचणी येत आहेत. या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी आता प्रेक्षकांना २०१९ ची वाट पाहावी लागणार आहे.
प्रदर्शनाची तारीख पुढे
‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार वीएफएक्सच्या (ग्राफिक्स) कामामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर जात आहे. सध्या वीएफएक्सवर दिवसरात्र काम सुरू असूनही ते वेळेत पूर्ण होईल असे निर्मात्यांना वाटत नाही. त्यामुळेच हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राफिक्सचा वापर होणार असून ते पूर्ण करण्यासाठी अजून बराच अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याशिवाय निर्मात्यांकडे दुसरा पर्याय उरलेला नाही.
४५० कोटींचे बजेट
रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या ‘२.०’ चित्रपटाची त्यांचे चाहते प्रकर्षाने वाट पाहत आहेत. ‘२.०’ मध्ये रजनीकांत दुहेरी भूमिकेत दिसणार असून अॅमी जॅक्सनचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ४५० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट जगभरात सुमारे १५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.