नंदुरबार (रवींद्र चव्हाण) । अक्षयतृतीया म्हणजेच आखाजी, खान्देशातील जिव्हाळ्याचा सण म्हणून अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. या सणानिमित्त सासूरवासिणी मुली माहेरी दाखल झाल्या असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अक्षय्य तृतीया म्हटली म्हणजे वर्षभरातील शेती कामांचे नियोजन करण्याचा हा दिवस ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी महत्वाचा असतो. याच दिवशी शेतात काम करणार्या सालदारांचे वेतन ठरविण्याची परंपरा खान्देशात आहे. महिलांच्या दृष्टीने देखील आखाजी या सणाला जिव्हाळ्याचे स्थान आहे. अक्षय्य तृतीयेची चाहूल लागताच सासूरवासीणी मुलींना माहेरी येण्याची ओढ लागते.
या सणानिमित्त गावागावातल्या सूसरवासिणी मुली एकत्र येवून झोक्याचा आनंद लुटत असतात. नुसता आनंदच नाही तर लहानपणींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आहिराणी भाषेतून गाणी म्हणजे असतात. आथानी कैरी… तथानी कैरी… कैरी झोका खाय व्ह… कैरी तुटनी खडक फुटना झुई… झुई, पाणी व्हाय व्ह… यासारख्या गितांच्या ओळीतून मुली आपल्या भावना मांडत असतात. फुगड्या खेळणे, गावाच्या वेशीवर जावून दुसर्या गावातील महिलांना चिडवणे, यासारखे खेळ आखाजीच्या दिवशी रंगत असतात. याच दिवशी घागरीची पुजा करून पूर्वजांना आमरण पुरीचे नैवेद्य दाखवण्याची धार्मिक परंपरा असून ती आजही टिकून आहे. दि. 28 एप्रिल रोजी हा अक्षय्यतृतीयेचा सण सर्वत्र साजरा होत असून यानिमित्ताने ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. खास करून खान्देशात या सणाची परंपरा आजही टिकून आहे हे विशेष.