मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. अक्षय आणि सायनाला नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. यानंतर अक्षय कुमार आणि सायना नेहवालने शहीद जवानांचा कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती.
‘पीपल्स लिबरेशन ऑफ गुरिल्ला आर्मी’ने केला अक्षय व सायनाचा निषेध
त्या मदतीलाच आक्षेप घेत नक्षवाद्यांनी चक्क एक पत्रक काढून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यापुढे नक्षली हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करु नका, असा इशाराही नक्षलवाद्यांनी दिला आहे. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांनी केलेल्या आर्थिक मदतीचा आम्ही निषेध करतो, असे पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी म्हणजेच पीएलजीएने पत्रकात म्हटलं आहे. पत्रकात ”पीपल्स लिबरेशन ऑफ गुरिल्ला आर्मी”नं अक्षय व सायनाने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केलेल्या आर्थिक मदतीचा निषेध करत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत न करण्याची धमकी दिली आहे.
अक्षयने 9 लाख तर सायनाची 50 हजाराची मदत
मार्च महिन्यात सुकमा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते. गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यांपैकी एक म्हणून या हल्ल्याची गणना झाली होती. या हल्ल्यानंतर अक्षय कुमार याने शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 9 लाख रूपये तर सायना नेहवाल हिने प्रत्येक कुटुंबाला 50 हजार याप्रमाणे सहा लाख रूपयांची आर्थिक मदत देऊन केली होती.
नक्षलवाद्यांनी घेतलेली भूमिका दुटप्पी आणि मानवताविरोधी
पोलिसांच्या मते नक्षलवाद्यांनी वाटलेली पत्रके सुकमा हल्ल्यापूर्वीच छापण्यात आल्याची शक्यता आहे. या पत्रकांमध्ये गोरक्षकांकडून दलित आणि मुस्लिमांवर करण्यात येणार्या हल्ल्यांवरही भाष्य करण्यात आले आहे. मात्र, या पत्रकांमधून नक्षलवाद्यांनी घेतलेली भूमिका दुटप्पी आणि मानवताविरोधी असल्याचे पोलीस अधिकार्यांनी म्हटले आहे. सुरक्षा दलातील जवान गरीब कुटुंबातील असल्याने ते आमचे शत्रू नाहीत, असा दावा सुकमा हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी केला होता. मग आता नक्षलवादी जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार्या आर्थिक मदतीला विरोध का करत आहेत? हा म्हणजे शुद्ध दुटप्पीपणाचा प्रकार झाला, असे पोलिसांनी म्हटले आहे.