जम्मू । दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्करी तळावर हल्ला केला आहे. रविवारी मध्यरात्री अखनूर येथे दहशतवाद्यांनी जीआरईएफ (जनरल रिझर्व इंजिनियर्स फोर्स)च्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात जीआरईएफच्या तिघांचा मृत्यू झाला आहे. अंधाराचा फायदे घेत दहशतवाद्यांनी हे कृत्य केले. हल्ल्या केल्यानंतर दहशतवादी
पळून गेले. सुरक्षा दलांनी परिसराची नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे. सुरक्षा दलांना हल्ल्यानंतर केलेल्या तपासात दहशतवाद्यांकडील हॅन्डग्रेनेड, जॅकेट व अन्य दारूगोळा सापडला आहे.
पाकमधील तळावरून आले दहशतवादी
या हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अखनूर उपविभागातील सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पळून गेलेले दहशतवादी अन्य ठिकाणी हल्ला करण्याची शक्यता सुरक्षा दलांनी व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांनी ज्या जीआरईएफच्या तळावर हल्ला केला आहे, तो तळ नियंत्रण रेषेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. दहशतवादी पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळावरून आल्याचे सुरक्षा दलाच्या तपसात निष्पन्न झाले आहे. अधिकार्याने सांगीतले की, मध्यरात्री सुमारे 1.15 च्या सुमारास बाटला येथे लष्करी तळावर हा हल्ला झाला. यामध्ये तिन कामगारांचा मृत्यू झाला आहे.