अखर्चित निधीला मुदतवाढ देण्यास शासनाचा नकार

0

चार वर्षात 25 कोटींपैकी 10 कोटींची झाली कामे तर 15 कोटी अखर्चित

जळगाव-शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षापूर्वी महापालिकेला 25 कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, आतापर्यंत केवळ 10 कोटींचीच कामे झाली आहेत. 15 कोटींची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे अखर्चित 15 कोटींच्या निधीला मुदतवाढ देण्यास शासनाने नकार दिला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शहरातील विकासकामांना 25 कोटी रुपये निधी दिला होता. सर्व निधीतील कामांना मंजूरी देवून कार्यादेश देण्यात आले. परंतू महापालिकेच्या अधिकार्‍यांनी लक्ष न दिल्याने 15 कोटीच्या कामे घेतलेल्या मक्तेदाराने कामे सुरू केली नाहीत. त्यातच या निधीची मुदत संपली आहे. मनपा प्रशासनाने यासाठी शासानाकडे निधीला मुदत वाढवून देण्याची विनंती करण्याचे पत्र दिले होते. मात्र, शासनाने मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे आता 15 कोटी रुपयांच्या निधीतील कामे रखडणार आहे.

सत्ताधार्‍यांचे अपयश

तत्कालीन मुख्यमंत्री यांनी 20 जून 2015 रोजी हा निधी महापालिकेला विकासकामांसाठी दिला होता. दिला होता. हा निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षाची मुदत होती. मात्र, त्या दोन वर्षात देखील या निधीतून कामांचे प्रस्ताव योग्यपध्दतीने तयार करुन त्याची निविदा प्रक्रीया करण्यात आली नाही.

मुख्यमंत्री यांच्याकडून मिळालेला 25 कोटी रुपयांचा निधी चार वर्षात देखील महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला खर्च करता आली नाही, हे जळगावकरांचे दुर्भाग्य तर सत्ताधारी भाजपाचे अपयश असल्याचा आरोप मनपा विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन यांनी केला आहे. शिवसेना राज्यातील सत्तेचा उपयोग करुन हा निधी परत आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही महाजन यांनी सांगीतले.