अखिलेशची सायकल गेली खड्ड्यात

0

मुंबई । उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या निकालाबाबत एक्झिट पोलमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांच्या जवळ जाणारी कामगिरी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला करता आलेली नाही. या निवडणुकीला सामोरे जाताना, काम बोलता है, असे सांंगत अखिलेश यांनी राज्यात केलेल्या विकास कामांचा उल्लेख केला होता. प्रत्यक्षात मात्र, उत्तर प्रदेशातील जनतेने अखिलेश यांचा दावा खोटा ठरवत, काँग्रेसशी हातमिळवणी करण्याच्या निर्णयाच्या विरोधातही मतदान केले. याशिवाय प्रत्यक्ष वडिलांविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला, पार्टीत फुट पडण्याची कारणे अखिलेश यांनी सांगितली, त्याचा फायदाही त्यांना मिळाला नाही.

नेताजीच आपल्या सरकारविरुद्ध

समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंग यादव हे राज्यात नेताजी म्हणून ओळखले जातात. 2012 मधील निवडणुकीनंतर नेताजींनी अखिलेशला मुख्यमंत्री केले खरे, पण सुरुवातीपासूनच त्यांनी अखिलेशच्या नेतृत्वाबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अखिलेश सरकार काम नाही करत, अखिलेश सरकार मुस्लीमविरोधी असल्याचे मुलायम वेळोवेळी सांगत होते. याशिवाय अखिलेश सरकारविरुद्ध मुलायम आणि शिवपाल यांनी केलेल्या कारवायीमुळे त्याचा फायदा अखिलेश किंवा शिवपाल यांनाच होणार, त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही हे राज्यातील जनतेला समजले होते. घरातील अंतर्गत कलहाचा इ-गुड गर्व्हन्सशी संबंध जोडण्याचा प्रयत्न अखिलेश यांनी त्यावेळी केला होता.

मुस्लीम मतदार दुरावला
ज्या मुस्लीम मतदारांवर समाजवादी पार्टी किंवा बसपा हक्क सांगत होती त्याच मुस्लीम मतदारांनी मात्र विधानसभेच्या या निवडणुकीत अखिलेश, राहुल गांधी आणि मायावतींना पूर्णपणे नाकारले. याचाच अर्थ मुस्लीम मतदारांचा या तिघांकडून पूर्ण अपेक्षाभंग झाला आहे, असा होतो. मुझफ्फरनगरमधील दंगली, त्या दंगली शमवण्यात समाजवादी पार्टीला आलेले अपयशही सत्ताधार्‍यांच्या पराभवाला कारणीभूत आहे. या दंगलीमुळे शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. 50 हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. या दंगलीच्यावेळी अखिलेश सरकारने योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप मुस्लिमांनी केला. त्यामुळे अखिलेश सरकारची दंगो की सरकार, अशी ओळख झाली होती. अखिलेश यांच्या कार्यकाळात 2012 मध्ये 227, 2013 मध्ये 247, 2014 मध्ये 242, 2015 मध्ये 219 आणि 2016 मध्ये 100 जातीय दंगली राज्यात झाल्या. याशिवाय गोमांस खाल्ल्याप्रकरणी मारला गेलेल्या अखलाखच्या हत्येमुळे जाट समुदायासह मुस्लीमही अखिलेशपासून दुरावले. मुस्लीम मतांचे बसपा, अपक्ष आणि छोट्या पक्षांमध्ये झालेल्या विभाजनाचा फायदा भाजपला मिळाला.