अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था काम करणार विकासासाठी

0

पेण । आगरी समाजाचा सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीयस्तरावर विषेश प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेण येथे पत्रकारपरिषदेत दिली.आगरी समाजाची लोकसंख्या ही दोन ते अडीच कोटींच्या आसपास असून रायगड, ठाणे, मुंबईच नव्हे तर बुलडाणा, नाशिकमध्येदेखील या समाजाची वस्ती आहे. सूरतमध्ये तर आमदारदेखील या समाजाचे आहेत, तर परदेशातही आगरी समाज राहत असून, तेथे समाजाच्या संघटना आहेत. मात्र, समाजाचा विकास समाधानकारक विकास झाला नाही. 1952 सालचा काका कालेलकर कमिशनच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, अशी मागणी पाटील यांनी केली.

आज औद्योगिकीकरणाच्या नावावर आगरी समाजावर वरवंटा फिरवण्याचे काम शासनाकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक आगरी युवकांना कंपन्यांमध्ये नोकरीत सामावून घेतले जात नाही. छञपती शिवाजी महाराज व कान्होजी आंग्रे यांच्या आरमारातही आगरी समाजातील व्यक्ती होत्या. हा इतिहास आहे, तर मुंबईच्या जडणघडणीतदेखील आगरी समाजाचे महत्त्वाचे योगदान असल्याचा दावा त्यांनी केला.

समाज एक व्हावा यासाठी आम्ही एकत्र
विखुरलेल्या आगरी समाजाला एकञ करण्याचा हा आमचा प्रयत्न असून, राजकारणविरहित ही संघटना असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या वतीने साहित्य संमेलन, गुणवंत व्यक्तींचा व विद्यार्थ्यांचा सत्कार, भजन स्पर्धा, कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात सुरू असणार्‍या साखरपुडा व हळदी समारंभात सुरू असणार्‍या अनिष्ट प्रथा बंद करण्याबाबत प्रयत्न केले जातील. भात शेती वाचवण्यासाठी खारभूमी खात्यामार्फत प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले, तर कार्याध्यक्ष विष्णू पाटील यांनी आगरी समाजात एकी नाही. समाज एक व्हावा यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. नोकरभरतीत येथील तरुणांनाच प्राधान्य दिले जावे, ही आग्रही भूमिका आहे. शेतकर्‍यांनी स्वस्तात जमिनी द्याव्यात यासाठी खारबंदिस्तीला खांडी घालवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या पत्रकार परिषदेस संजय ठाकूर, एकनाथ खानावकर, अनिल मोकल, एस. एस. पाटील, लवेंद्र मोकल आदी उपस्थित होते.