अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन

0

ठाणे : २९ वे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन ठाणे येथे होत असून या संमेलनाच्या उद्घाटनासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तर समारोप प्रसंगी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. २१ ते २३ एप्रिल असे तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्यावर आधारित परिसंवाद, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. हे संमेलन गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे.

स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान व स्वा. सावरकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन २१ ते २३ एप्रिल या कालावधीत करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अमित शहा यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री रविंद्र चव्हाण, महापौर मीनाक्षी शिंदे, संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे, खा. राजन विचारे, खा. विनय सहस्त्रबुद्धे, खा. कपिल पाटील, आ. संजय केळकर उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी दुपारी साडेतीन वाजता शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून सायंकाळी साडेआठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी २२ एप्रिलला ‘भारताची संरक्षण सिद्धता’ या परिसंवादात मेजर शशिकांत पित्रे व कमांडर सुबोध पुरोहित सहभागी होतील तर ‘सावरकरांचे साहित्य विश्व’ या परिसंवादात डॉ. शरद हेबालकर, प्रमोद पवार हे भाग घेणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे असणार आहेत. ‘सावरकर आजच्या संदर्भात’ या विषयावर शंतनू रिठे यांचे भाषण होणार असून अध्यक्षस्थानी प्रकाश पथक हे असणार आहेत. सायंकाळी ‘महाकवी सावरकर’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

तिसऱ्या दिवशी २३ एप्रिलला ‘अनादी मी अनंत मी’ या नाटकाचे अभिवाचन होणार आहे. ‘भारतातल्या समाजसुधारणा’ या विषयावरील परिसंवादात प्रा. रमेश कांबळे, डॉ. नीलम गोऱ्हे, किशोर जावळे हे भाग घेणार असून अध्यक्षस्थान डॉ. अशोक मोडक भूषविणार आहेत. ‘अल्पज्ञात सावरकर’ या विषयावर विक्रम एडके यांचे भाषण होणार असून अध्यक्षस्थानी चंद्रकांत शहासने हे असतील. ‘सावरकरांवरील आक्षेप व निराकरण’ या विषयावरील परिसंवादात गजानन नेरकर, अरविंद कुलकर्णी हे भाग घेणार असून अध्यक्षस्थानी डॉ. श्रीरंग गोडबोले असणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता समारोपीय सत्राला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री विनोद तावडे व संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, संमेलनपुर्व कार्यक्रम दि. १४ ते २० एप्रिल या कालावधीत होणार आहेत. यामध्ये दि. १४ एप्रिल रोजी साय. ५ वा. सावरकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन खुले कला दालन, मीठ बंदर, ठाणे पुर्व येथे होईल. दि. १५ व १६ एप्रिल रोजी साय. ७ वा. वीर सावरकर हा मराठी चित्रपट भारतीय स्त्री जीवन विकास परिषद , जिजामाता मार्ग, ठाणे पुर्व आणि रिक्रिएशन क्लब, टेनिस ग्राउंड , हरी ओमनगर मुलुंड पुर्व या दोन ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. दि. २० एप्रिल रोजी सायं. साडेपाच वा. ‘सावरकर एक अविस्मरणीय वादळ’ ही एकांकिका सहयोग मंदिर, घंटाळी येथे होणार असून ‘भारतीय सैनिकांची यशोगाथा’ व ‘मोहीम शिखर सावरकर’ या दृकश्राव्य व ध्वनी चित्रफित ही दाखवण्यात येणार आहे. सदर संमेलनात जास्तीत जास्त ठाणेकर व सावरकरप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष सुनील साठे यांनी केले आहे.