अखिल भारतीय हिंद केसरी स्पर्धा यंदा पुण्यात

0

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने अखिल भारतीय हिंद केसरी स्पर्धेचे 27 ते 30 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

लांडगे म्हणाले, इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही हिंद केसरी स्पर्धा बाबूराव सणस मैदानावर होईल. सलग चार दिवस चालणार्‍या या स्पर्धेची सुरूवात 27 एप्रिल रोजी होईल. त्यापूर्वी सर्व सहभागी राज्यांचे मल्ल प्रतिनिधी मानवंदना देण्याकरिता सायंकाळी 5.30 वाजता दगडूशेठ मंदिरात येणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात येईल. यावेळी महापौर मुक्ता टिळक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी हिंदकेसरी स्पर्धेच्या गेल्या 50 वर्षाच्या इतिहासावर हिंद केसरी यशोगाथा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

गोडसे यांनी सांगितले की, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे संस्थापक कै.वस्ताद पै. दगडूशेठ यांच्या पवित्र स्मृतीला मानवंदना म्हणून या सुवर्णमहोत्सवी स्पर्धेचा मान पुणे शहर, पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून मिळाला आहे.

ट्रस्टने यापूर्वी शताब्दी वर्षामध्ये सन 1992 साली हिंद केसरी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते. आपल्या भारतीय खेळांना प्रोत्साहन म्हणून तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कुस्तीगिरांना देशाकरिता द्वैदिप्यमान कामगिरी करता यावी या हेतूने हिंद केसरी स्पर्धेचे आयोजन ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

रविवारी सायंकाळी किताबी लढत आणि बक्षिस वितरण समारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. या स्पर्धेला शनिवारी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील भेट देणार आहेत. तसेच राज्यातील हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी विजेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यातील हिंदकेसरींचा मानपत्र आणि गौरव चिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, नगरसेवक हेमंत रासने, मुरलीधर लोंढे आदी विश्‍वस्त उपस्थित होते.

बाबूराव सणस स्टेडियमवर जय्यत तयारी

85 ते 130 किला वजनगटातील हिंद केसरी विजेत्याला 2.50 लाख व चांदीची गदा बक्षिस स्वरूपात देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकास 1.50 लाख, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास 75 हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. इतर गटातील प्रथम चार विजेत्यांना ही बक्षिसे देण्यात येतील. या स्पर्धेत एकूण 14 लाख 65 हजार रूपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेची जय्यत तयारी बाबूराव सणस स्टेडियमवर सुरू असून आखाडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेल. दोन मैदानात होणार्‍या स्पर्धा प्रकाशझोतात खेळविल्या जाणार असून हिंद केसरी किताबासह पुण्यातील स्पर्धा आठ वजनगटात रंगणार आहे. हिंद केसरी किताबाचा खुला गट 82 ते 130 किलोग्रामचा आहे.