पुणे : सध्या भाऊ रंगारी आणि टिळक वाद जोरात सुरू असताना आता शारदा गणपतीच्या अखिल मंडई मंडळ ट्रस्टचा वाद निर्माण झाला आहे. गणेशोत्सवात शारदा-गजानन मुर्ती प्रथम स्थापित करणारे लक्ष्मराव काची यांचे वारस राजन काची, अशोक काची, किशोर काची आणि मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह शेडगे यांच्यात वाद निर्माण झाला असून हे प्रकरण आता धर्मादाय आयुक्तांकडे गेले आहे. गणपती उत्सवकाळात प्राणप्रतिष्ठापना, दृष्ट काढणे व आरती करण्याचा तसेच संस्थापक सदस्य या नात्याने विसर्जन मिरवणुकीत रथाचे स्वारस्य करण्याचा पारंपारिक हक्क आणि संस्थापक कुटुंबातील दोन सदस्यांना कायम विश्वस्त म्हणून नेमणुक करावी, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांकडे काची बंधुंनी केली आहे.
कायम विश्वस्त म्हणून नेमणूक करा
अखिल मंडई मंडळाने स्थापित केलेल्या शारदा गजानन मुर्तिचे संस्थापक लक्ष्मणराव काची उर्फ डोंगरे पहिलवान यांच्या वारसांनी धर्मादाय आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शारदा गजानन मंदीरामध्ये ऑगस्ट 2015 मध्ये मुर्तीच्या दागदागिन्यांची चोरी झाली आणि तेव्हापासून अनेक बाबी उघड झाल्या आणि वाद निर्माण झाला. मंडळाच्या धार्मिक कार्यक्रमात परंपरागत वारसांना डावलले जाते आहे. तसेच संस्थापकांचा इतिहासही लपवला जात असल्यचा आरोप काची बंधूंनी केला आहे. अखिल मंडई मंडळ ट्रस्टची नोंद (रजि. अ. न. 377) आहे. परंतु, मंडळाची विधीलिखीत घटना नाही. त्यामुळे काची बंधुंनी गणपती उत्सवकाळात प्राणप्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुकीचा रथ निघण्यापुर्वी शारदा गजाननाची दृष्ट काढण्याचा व आरती करण्याचा तसेच संस्थापक सदस्य या नात्याने विसर्जन मिरवणुकीत रथाचे स्वारस्य करण्याचा पारंपारिक हक्क आणि संस्थापक कुटुंबातील दोन सदस्यांना कायम विश्वस्त म्हणून नेमणूक करावी, असा अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे काची बंधुंनी केला आहे.
मंडळाचा इतिहास
पेशवाई काळात अंदाजे 200 वर्षापुर्वी 1810 साली भाजी मंडई ही भाजी आळी (गणेश पेठ) येथे भरत असे. तेथे कै. नथुराम तुळजाराम काची पैलवान दलालीचा व्यवसाय करत असत. त्याआधी त्यांचे वडील तुळजाराम काची आणि नथुराम यांचे आजोबा गणपतराव काची 250 वर्षापासून वास्तव्यास होते. आज काची कुटुंबीयांची ही 10 वी पीढी येथे कार्यरत आहे. सन 1818 ते 1856 काळात व्यापार शनिवारवाडा येथे स्थलांतरीत झाला. त्यानंतर 1886 मध्ये लॉर्ड रे मार्केट (सध्याची महात्मा फुले मंडई) व तेथून पुढे 1978 साली व्यापार छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथे स्थलांतरीत झाला. 1859 साली नथुराम काची यांनी प्रथम शारदा गजानन मुर्तीची प्रतिष्ठापना केली.
अखिल मंडई मंडळाची स्थापना
सन 1886 साली मंडईतील व्यापार्यांनी एकत्र येऊन नथुराम काची यांना गणेश मंंडळ स्थापनेची विनंती केली. पुढे छ. शिवाजी संघ स्थापन झाला आणि त्यानावाने उत्सव सुरू झाला. सन 1954 साली अखिल मंडई मंडळाची स्थापना होऊन शासनाकडे 377 क्रमांकाने नोंद झाली. 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना लोकमान्य टिळकांनी मंडली व सार्वजनीक गणेशोत्सवाला सुरवात झाली. 1986 साली म. फुले मंडईचा शताब्दी मोहोत्सव पुणे मनपातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यावेळी सर्वात जुनी आढती पीढी म्हणून पैलवान पीढीचा सत्कार झाला होता.
मंडळाचा वाद
सन 2015 रोजी शारदा गजानन मूर्तीचे दागीने चोरीस गेले तेव्हापासून मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष विजयसिंह शेडगे, अखिल मंडई मंडळ उत्सव समितीचे अध्यक्ष आण्णा थोरात यांच्यातील वाद उफाळून आला. त्यात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. सदरच्या वादामुळे धर्मादाय आयुक्त प्रशासक नेमण्याच्या निर्णयावर आले होते. तसेच मंडळ बर्खास्त का करू नये, असा सवालदेखील केला होता. तुर्त बर्खास्तीचा निर्णय बाजूला झाला आहे. दिनांक 5 सप्टेंबर 2016 रोजी शारदा गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या दिवशी उत्सव अध्यक्ष थोरात यांनी काची कुटुंबीयांसंबंधी गैरसमज पसरविला व पुजेस बसण्यासाठी अडसर निर्माण केला, असा आरोप काची बंधुंनी धर्मादाय आयुक्तांकडे निवेदनातून केला आहे.