अखिल मंडई मंडळाच्या ‘शारदा-गजानन’ मूर्तीचे कॉपीराईट

0

पुणे । महात्मा फुले मंडईतील शारदा गजाननाच्या विलोभनीय मूर्तीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या मूर्तीची कॉपीराईट नोंदणी नुकतीच करण्यात आली आहे. दिल्ली येथील कॉपीराईट ऑफिसमधून ही नोंदणी करण्यात आली आहे. यासोबतच ‘अखिल मंडळ, पुणे’ हे नाव देखील ट्रेड मार्क म्हणून नोंदणीकृत करण्यात आले असून यामुळे शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजर्‍या करणार्‍या मंडई गणपती मंडळ व मूर्तीचे वेगळेपण आणखी उत्तमरितीने जपले जाणार आहे.125व्या वर्षानिमित्त कार्यकर्त्यांचा पुढाकार

अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, विश्‍वास भोर, देविदास बहिरट यांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले. देशभरातील सुप्रसिद्ध मंदिरे, तेथील मूर्ती यांची कॉपीराईट व टेलड मार्क नोंदणी झाली असून मंडई मंडळानेही यंदा 125व्या वर्षानिमित्त याकरिता पुढाकार घेतला आहे.

नावाचे व मूर्तीचे वेगळेपण जपले जाणार
थोरात म्हणाले, अखिल मंडई मंडळ, पुणे असे नाव मुंबई येथील कार्यालयातून टेलड मार्क नोंदणीकृत करण्यात आले असून यामुळे इतर कोणालाही हे नाव वापरता येणार नाही. तर, शारदा गजाननाची मूर्ती कॉपीराईटद्वारे नोंदणीकृत झाल्याने ही मूर्ती इतर कोणालाही परवानगी शिवाय साकारता वा वापरता येणार नाही. आपल्या नावाचे व मूर्तीचे वेगळेपण यानिमित्ताने जपले जाणार आहे.