अखेरचा प्रवास सुखद…भुसावळातील स्मशानभूमीसाठी स्वखर्चातून बांधले ओटे

0

सामाजिक भावनेतून आईच्या स्मरणार्थ नगरसेवक पिंटू कोठारींचे दातृत्व

भुसावळ- आला सास, गेला सास, देवा तुझ रे तंतर, अरे जगन-मरन, एका सासाच अंतर ! खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील या ओवीतून मानवी जीवनाचे वर्णन कळते. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरण अटळ असलेतरी ‘जीवन जगत असताना जगाच्या या रंगमंचावर असे काही करून जा, की तुमची भूमिका संपल्यावरसुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे!’ या उदात्त भावनेतून अखेरचा प्रवास सुखर होण्यासाठी शहरातील नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते व साईभक्त निर्मल (पिंटू) कोठारी यांनी शहरातील तापी काठावरील स्मशानभूमीत सुमारे एक लाख रुपये खर्चातून चार नवीन ओट्यांचे बांधकाम केल्याने या सामाजिक उपक्रमाचे शहरवासीयांमधून कौतुक होत आहे.

कर्तृत्वाच्या ठशाशिवाय समाजाला ओळख नाही
दुसर्‍यांच्या भावना, दुःख आपण समजून घेत जीवन जगायला हवं. जीवनात जर आपण कुणाला हसवू शकलो नाही, तर कमीत कमी त्याला रडवू शकणार नाही, याची काळ्जी आपण घ्यायला हवी! समाजात तुमचा मान-सन्मान, ओळख तुमच्या कार्य व कर्तृत्वावर होते तेव्हा ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या त्या क्षेत्रात आपले कार्य, कौशल्य शिगेला पोहाचायला हवे, हाच आपल्या यशाचा खरा मार्ग असतो. आपल्या कर्तृत्वाचा ठसा जोपर्यंत समाजात उमटत नाही, तोपर्यंत खर्‍या अर्थाने आपली समाजाला ओळख होऊ शकत नाही या भावनेतून वाटचाल करीत असलेल्या नगरसेवक कोठारी हे गेल्या 13 वर्षांपासून स्व. मोतीलाल लखीचंद निमाणी ट्रस्टच्या माध्यमातून वैकुंठ वाहिनी रथाच्या माध्यमातून अंत्यसंस्कारासाठी वाहन उपलब्ध करून देतात तर वाहनाच्या दिवसभरातून किमान सात ते आठवेळा वापर केला जात असल्याने व दररोजच्या मृतांची संख्या पाचपेक्षा अधिक असल्याने त्यांनी स्मशानभूमीची पाहणी केल्यानंतर तेथे अवघे पाच ओटे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जागेअभावी उर्वरित मृतांवर तापीपात्रात अंत्यसंस्कार होत असल्याचीही बाब समोर आल्यानंतर नगरसेवक निर्मल कोठारी यांनी स्व. मोतीलाल लखीचंद निमाणी व स्व. विमलाबाई रमेशचंद कोठारी यांच्या स्मरणार्थ नवीन चार ओट्यांची उभारणी केली. यासह अंत्यसंस्कार होणार्‍या परीसरात तब्बल 60 ब्रॉसचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले. यामुळे आता तापीपात्रात मृतांवर अंत्यसंस्कारांची गरज शक्यतो भासणार नाही. नगरसेवक निर्मल कोठारींच्या दातृत्वाने मृतांच्या नातेवाईकांना होणारा त्रास टळत आहे.

विसाव्याची केली सुविधा
स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी आणलेला मृतदेह तयारीच्या दरम्यान विसावा म्हणून बाजूला ठेवला जातो. विसाव्यासाठी यापूर्वी स्मशानभुमीत कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. मात्र कोठारी यांनी विसाव्यासाठी एक स्वतंत्र मार्बल बसविलेला ओटा तयार केल्याने मृतदेह या विसाव्याच्या ओट्यावर ठेवण्याची सोय झाली आहे.

आईच्या स्मरणार्थ सेवा -नगरसेवक कोठारी
आईच्या स्मरणार्थ ही सेवा देण्याचा छोटाचा प्रयत्न केला असून वैकुंठवाहिनीची गेल्या 13 वर्षांपासून सेवा देत आहे. समाजाचे आपण देणं लागतो या भावनेतून आपला समाजकार्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न राहिला आहे व यापुढेही आयुष्यदेखील आपण सामाजिक कार्यासाठी खर्ची घालणार असल्याचे नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी सांगितले.