इंपोह (मलेशिया) । अझलन शहा हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, दुसर्या सामन्यात भारताने विजयाच्या संधीवर पाणी फिरवले. अखेरच्या सत्रापर्यंत 1-0 अशा आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला अखेरच्या काही मिनिटांत इंग्लंडच्या खेळाडूंवर अंकुश ठेवणे जमले नाही. याचा फायदा घेत पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत इंग्लंडने सामन्यात बरोबरी साधली. पहिल्या सामन्याच्या तुलनेत इंग्लंडविरुद्ध भारताने आश्वासक खेळ केला असला तरीही या सामन्यात भारताने तब्बल 9 पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. या 9 पैकी एकाही संधीचे गोलमध्ये रूपांतर झाल्यास या सामन्याचा निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागू शकला असता. पहिल्या सामन्याप्रमाणे इंग्लंडविरुद्ध सामन्यातही भारताच्या युवा खेळाडूंनी आश्वासक खेळ केला. रमणदीप सिंह, तलविंदर सिंह, सुमीत कुमार या खेळाडूंनी पहिल्या सत्रात इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्चस्व गाजवले. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी एकामागोमाग एक आक्रमक चाली रचत इंग्लंडवर दबाव टाकायला सुरुवात केली. अखेर पहिल्या सत्राच्या अखेरीस रमणदीप सिंह आणि तलविंदर यांनी रचलेल्या चालीवर नवोदीत खेळाडू शिलानंद लाकराने चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत भारताला सामन्यात आघाडी मिळवून दिली.
पेनल्टी कॉर्नवर मिळालेल्या संधींचं गोलमध्ये रूपांतर न होणे हे भारत आज सामना जिंकू न शकण्यामागचे महत्वाचे कारण ठरले आहे. रुपिंदरपाल सिंह आणि हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत खेळणार्या भारतीय संघाचे ड्रॅगफ्लिकींग सेक्शन कमकुवत झाले आहे. मध्यांतरापर्यंत भारताला तब्बल आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, एकाही संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले. यानंतर तिसर्या सत्रात इंग्लंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या बचावफळीने भक्कम बचाव करत इंग्लंडच्या खेळाडूंचे मनसुबे हाणून पाडले. भारतीय खेळाडूंची सामन्यावरील पकड पाहता 27 व्या सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेत भारत आपला पहिला विजय मिळवणार असे वाटत असताना, शेवटच्या पाच मिनिटांत पंचांनी इंग्लंडला पेनल्टी स्ट्रोकचा फटका बहाल केला. याचा फायदा घेत इंग्लंडच्या मार्क ग्लेघोरीनने गोल करत सामन्यात इंग्लंडला बरोबरी साधून दिली.
संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली
इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाची दोन कारणांमुळे चिता वाढली आहे. अझलन शहा हॉकी स्पर्धेचे सहावे विजेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला पुढचा सामना जिंकावा लागणार आहे. 6 मार्च रोजी होणार्या सामन्यात भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलयाचे आव्हान असणार आहे. याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नऊ पेनल्टी कॉर्नर मिळूनसुद्धा गोल बनवण्यात अपयश आल्याने संघाची डोकेदुखी वाढली आहे. आगामी काळात भारत एप्रिल महिन्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ऑगस्टमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे पेनल्टी कॉर्नरच्या दुखण्यावर भारतीय संघ व्यवस्थापनला रामबाण उपाय शोधावा लागेल.