अडावद । येथील विद्यमान सरपंच भारती महाजन यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर शुक्रवार 7 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा घेण्यात आली. प्रशाकिय अधिकारी तहसिलदार दिपक गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत अविश्वास ठरावाच्या बाजुने फक्त 9 सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास प्रस्ताव बारगळला. सरपंच भारती सचिन महाजन यांच्या विरुध्द 10 ग्रामपंचायत सदस्यांनी विविध आरोप करित तहसिलदार दिपक गिरासे यांच्याकडे 3 रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तहसिलदार दिपक गिरासे यांनी शुक्रवार 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावल्यानंतर सभेस सुरूवात करण्यात आली.
अविश्वास प्रस्तावासाठी झाले मतदान
सरपंच भारती महाजन, हनुमंत महाजन, संजय सोनेरी-चव्हाण, शे. हमीदाबी समसोद्दीन, विजिता पाटील, रुकसानाबी मन्यार, आसाराम कोळी, मदतअली सैय्यद, राजेश देशमुख, जहांगीर पठाण, दिनकर देशमुख, छोट्याबाई पाटील उपस्थित होते. यावेळी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करणेत येवुन हात ऊंचाऊन मतदान घेण्यात आले. अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने 9 जणांनी तर अविश्वास प्रस्तावाच्या विरुध्द 3 जणांनी मतदान केले. ग्रामपंचायतीत 14 सदस्यांचे संख्याबळ असल्याने अविश्वास प्रस्तावास 11 सदस्य आवश्यक होते. अखेर प्रस्तावाच्या बाजुने कमी मते पडल्याने अध्यासी अधिकारी तहसिलदार दिपक गिरासे यांनी अविश्वास ठराव नामंजुर झाल्याचे घोषीत केले. यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून तहसिलदार दिपक गिरासे यांनी काम पाहिले तर ग्रामविकास अधिकारी प्रदिप धनगर, अव्वल कारकुन सुरेश पाटील, तलाठी व्ही.डी.पाटील यांनी सहकार्य केले.