अनेक उपसूचना ग्राह्य आणि अग्राह्य
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्षांच्या 5262.30 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी महासभेने मंजुरी दिली. या अर्थसंकल्पाला सुमारे 1112 उपसूचना सत्ताधारी भाजपने दिल्या आहेत. अर्थसंकल्पावरील तहकूब सभेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
अर्थसंकल्पावर मागील मंगळवारी (दि. 20) सुमारे साडेसात तास चर्चा झाली. अर्थसंकल्पावर साडेसात तास चर्चा केल्यानंतर सत्ताधारी भाजपने 300 कोटी रुपयांच्या तब्बल 700 उपसूचना दिल्या होत्या. मूळ उपसूचना चार असून त्याला पोट उपसूचना 700 दिल्या होत्या. यामध्ये नवीन लेखाशिर्ष सुरु करण्याच्या जवळपास 450 उपसूचना आहेत. वाढ-घटीच्या 103 उपसूचना आहेत.
यानंतर पालिकेने 21 तारखेला सर्व उपसूचना प्रसिद्धीस दिल्या होत्या. मुख्य लेखापाल राजेश लांङे यांनी उपसूचना ग्राह्य, अग्राह्य ठरविल्या आहेत. अंदाजपत्रक सभेसमोर मांडणार्या तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी ग्राह्य उपसूचना स्वीकारल्याचे सांगितले. त्यानंतर फेरफार करून अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्याचे महापौरांनी जाहीर केले.