शहादा, ता. 22: अखेर आज सारंगखेडा येथील पुलाच्या पडलेल्या भागाच्या कामाला चालना मिळाली. सुरत येथील कामातील निष्णात ठेकेदार रॉबिन वॉल यांच्या टीमने पुलाच्या खालील भागाची पाहणी केली. लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचे सूचक वक्तव्य या वेळी करण्यात आले. मात्र आज सकाळ पासून प्रत्यक्ष कामाला कामासाठीच्या साहित्याची जुळवाजुळव राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे करण्यात येत असल्याचे दिसून आले. सुरत येथील अनुभवी ठेकेदारांमार्फत पुलाच्या खालील भागाची पाहणी करण्यात आली. भरावाच्या गॉबीन वॉलचे कामातील तज्ञ असलेल्या या ठेकेदाराकडून सदरचे काम करण्यात येणार आहे.
दरम्यान माजी मंत्री जयकुमार रावल यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह केंद्रीय सडक निर्माण मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची दिल्ली येथे भेट घेवून बंद करण्यात आलेल्या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्यासह जुन्या पुलाजवळच समांतर असा नवीन पुल मंजूर करावा अशी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसादासह निधी उपलब्ध करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले आहे.
सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाला पडलेले मोठे भगदाड आणि भराव खचल्याने गत रविवारी दुपारपासुन वाहतूक बंद आहे. शहादा भागाला धुळे व अन्य भागाला जोडणाऱ्या या पुलाची तत्काळ दुरुस्तीसह दोषींवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. शेवटी आज पाचव्या दिवशी पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दोन महिन्यात काम पूर्ण होणार असल्याची अपेक्षा महामार्ग विभागाची आहे. त्यादृष्टीने कामाचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या तांत्रीक पथकाकडून पाहणी झाल्यानंतर गॉबीन वॉलच्या कामासाठी सुरत येथील हिंदूस्थान कंपनीच्या ठेकेदाराकडून काल पाहणी केली. ठेकेदार गॉबीन वॉल कामाची दोन ते तीन दिवसात इस्टीमेट तयार करुन देणार आहे. ही कंपनी पाण्यातील गॉबीन वॉलचे काम करते. इस्टेमेट नंतर संबंधित विभाग या कंपनीला काम देईल. या पूर्ततेसाठी आठवडाभर लागेल. त्यानंतर प्रथमदर्शीय कामाला सुरुवात होईल . सध्या पुलाच्या खालील भागाची जागेची लेव्हल करण्याचे काम आज सुरू झाले. भराव खचल्याने पुलाच्या संरक्षण कठड्यालाही मोठा तडा गेला आहे. पुलाची दुरुस्ती करतांना पुलाला भविष्यात धोका निर्माण होऊ नये असे काम करावे लागणार आहे.
तापी नदीवरील हा पुल वाहतुकीसाठी बंद असल्याने शहादा-शिंदखेडा तालुक्यातील जनतेची मोठी गैरसोय होत असल्याने या पुलाचा तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. तसेच हा पुल ७२ वर्षे जुना झाला असून दुरुस्ती करूनही या पुलावरून जास्त काळ वाहतूक होवू शकणार नाही. त्यामुळे याच पुलाच्या अगदी जवळ समांतर असा नवीन पुल मंजूर करावा अशी मागणी माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांनी दिल्ली येथे केंद्रीय सडकमंत्री ना. नितीनजी गडकरी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेवून केली. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. या पुलाचा राष्ट्रीय महामार्गात सामावेश करण्यात आला आहे. हा पूल तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आला असून त्यासाठी निधीही आवश्यक तेवढा निधी देण्यात येवून लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती केली जाईल. तसेच या पुला जवळ नवीन पूल तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना करण्यात येतील असे ठोस आश्वासन मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिले आहे. यावेळी धुळे येथील खा. डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते.