अखेर आरोग्यप्रमुख येणार!

0

पुणे । गेले तीन महिने रिक्त असलेले महापालिकेचे आरोग्यप्रमुखपद भरण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मे महिन्यात तत्कालीन आरोग्यप्रमुख सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर वारंवार मागणी करूनही प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हे पद रिक्त होते. आधीचे आरोग्यप्रमुख सेवानिवृत्त झाल्यावर महापालिका प्रशासनाने आरोग्यप्रमुखाची नेमणूक राज्य सरकारने करावी, असे पत्र दिले. त्या पत्राला नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यावर आयुक्त कुणालकुमार यांनी या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अखेर प्रशासनाने जाहिरात जारी केली असून शहराला लवकरच नवे आरोग्यप्रमुख मिळणार आहेत. या पदासह विविध विषयांचे तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी अशा एकूण 11 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीला मिळणार्‍या प्रतिसादावरून मुलाखतीचे स्वरूप निश्चित करण्यात येते. एखाद्या पदासाठी 50 पेक्षा अधिक संख्येने उमेदवार आल्यास त्यांची लेखी परिक्षा आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे. मात्र 50 पेक्षा कमी उमेदवार आल्यास थेट मुलाखत घेतली जाणार आहे. आरोग्यप्रमुख पदासाठी एमडी, पीएसएम या शैक्षणिक अहर्तेबरोबरच सहायक आरोग्य अधिकारी पदाच्या अनुभवाची अट आहे.