अखेर उद्यापासून सुरु होणार ग्रंथालये; राज्य सरकारचा मोठा निर्णय

0

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत आहे. अनलॉक अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान उद्या १५ ऑक्टोंबरपासून राज्यातील सर्व ग्रंथालये आणि मुंबईतील मेट्रो सेवा सुरु करण्याचा मोठा निर्णय राय सरकारने घेतला आहे. कंटेन्मेंट झोन बाहेरील आठवडी बाजार सुद्धा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

विद्यार्थी, वाचन प्रेमींकडून ग्रंथालये सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही. पण, शाळेतील शिक्षक वर्गाला ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.

याचबरोबर, टप्प्याटप्प्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवासादरम्यान मुंबईकरांना होणारा त्रास थोडासा कमी होणार आहे. मेट्रो सेवा सुरु करण्याबाबतची SOP लवकरच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे. याशिवाय, कन्टेनमेंट झोनबाहेरील आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये कन्टेनमेंट झोनबाहेरील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.