माजी विद्यार्थी तथा विभागीय सचिव यांनी केले उद्घाटन
चाळीसगाव- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली शतकी परंपरा लाभलेले आनंदीबाई बंकट शाळेचे मुख्य प्रवेशद्वार गेल्या अनेक वर्षापासून बंद होते. मात्र शाळेची रस्त्यावरून खरी ओळख देणारे हे बंद प्रवेशद्वार उघडून त्याचे नूतनीकरण करण्याचा शाळेच्या १९९२ साली दहावीला असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी संकल्प केला,आणि संस्थेला खर्च न करु देता सर्व नूतनीकरण १७ विद्यार्थ्यांनी मिळून करुन दिले. नविन प्रवेशद्वाराचे उद्घाटन नासिक येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव नितीन उपासनी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना चाळीसगाव एज्यु.सोसायटी सचिव तथा माजी विद्यार्थी विनोद कोतकर यांनी सांगितले की माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून उभारलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटनदेखील याच शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या नितीन उपासनी हस्ते होणे हे संस्थेसाठीअभिमानाची बाब आहे. याप्रसंगी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायण अग्रवाल, अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, प्रमुख पाहुण्या युगंधरा फाऊंडेशन च्या स्मिता बच्छाव, संचालक राजेंद्र चौधरी, अशोक वाणी, योगेश अग्रवाल,प्रदीप आहिरराव , विश्वस्त अरविंद येवले यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.