भुसावळ । दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न तसेच येथील बंद असलेले वीज केंद्र सुरु करण्याबाबत कंत्राटी कामगार समितीतर्फे निवेदन देवूनही कुठलीही कार्यवाही होत नसल्यामुळे दिपनगर येथे मंगळवार 7 रोजीपासून कंत्राटी कामगारांतर्फे बेमुदत आंदोेलन पुकारण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कंत्राटी कामगार काळ्या फिती लावून कामकाज करतील तसेच दुपारी 12 वाजता द्वारसभा घेणार आहे.
पाच दिवसांच्या टप्प्यात करणार आंदोलन
येथील कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे कामगारांच्या मागण्यांसंदर्भात महावितरण प्रशासनास वारंवार निवेदन देण्यात आले. तसेच बंद असलेले वीज केंद्र सुरु करण्याबाबतदेखील नोटीस देण्यात आली होती. त्यावर कार्यवाही करण्याऐवजी मुख्य कार्यालयाकडून केवळ प्रतिनिधी पाठविले मात्र कार्यवाही झाली नाही.
त्यामुळे आंदोलनाचे शस्त्र उगारले असून 8 रोजी देखील काळ्या फिती लावून कामकाज व दुपारी 4 वाजता द्वारसभा, 14 रोजी लाक्षणिक उपोषण, 23 रोजी मोर्चा तर 28 रोजी संप पुकारण्यात येणार आहे. कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अरुण दामोदर, उपाध्यक्ष विक्रम चौधरी, कार्याध्यक्ष महेंद्र तायडे, सहसचिव चंद्रा अवस्थी, सुनिल ठाकूर, सचिन भावसार यांच्या नेतृत्वाखाली कामगार आंदोलनात सहभाग घेणार आहे.