अखेर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी सतेज पाटील; भंडारा कदमांकडे !

0

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारकडून दोन नव्या पालकमंत्र्यांची आज बुधवारी घोषणा करण्यात आली. त्यात कोल्हापूरचे पालकमंत्रिपदी सतेज उर्फ बंटी पाटील यांची तर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विश्वजीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील आठवड्यात पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात कोल्हापूरचे पालकमंत्री पद कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले होते. तर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सतेज पाटील यांच्याकडे होते. मात्र बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता विश्वजित कदम यांना नवीन संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत शिवसेनेकडे १३, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२ तर काँग्रेसकडे ११ पालकमंत्रीपदे आली होती.

बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री असलेले काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावरून स्पर्धा सुरू झाली होती. अखेर सतेज पाटलांची वर्णी लागली आहे. यापूर्वी हसन मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगरचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.