अखेर खडसेंच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल

0

मुंबई । अंजली दमानिया यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी अखेर मुंबईतील वाकोला पोलीस स्थानकात भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 2 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथे खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सभेत खडसे यांनी मला उद्देशून लज्जा उत्पन्न होईल असे विधान केल्याची तक्रार दमानिया यांनी केली आहे. तक्रार दाखल करण्यासाठी दमानिया यांनी कालपासूनच वाकोला पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. अखेर आज, गुरुवारी त्यांची तक्रार दाखल करण्यात आली.

पोलीस स्टेशनमध्येच काढली रात्र
तक्रारीत म्हटले आहे की, खडसे यांच्याकडे असलेली अमाप संपत्ती कुठून आणि कुठल्या मार्गाने आली त्यात बेहिशोबी वाढ कशी झाली याचे उत्तर देताना खडसे यांनी दमानिया यांना उद्देशून कुठल्याही महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले असल्याचे म्हटले आहे. याबाबत जळगाव पोलीस अधीक्षक व जळगाव पोलिसांना मॅसेज व इ-मेल द्वारे बुधवारीच माहिती दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दमानिया यांनी खडसेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तक्रार दाखल होत नसल्याने त्यांनी काल रात्री पोलीस स्टेशनमध्ये झोप काढली.

नाथाभाऊ नॉट रीचेबल
दरम्यान याविषयी खडसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र सम्पर्क होऊ शकला नाही. मात्र या पार्श्वभूमीवर बुधवारी आरोप नाकारत खडसे यांनी काहींना नुसते आरोप करायची लोकांना सवय असते सांगत माझा कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा उद्देश्य नव्हता, असे सांगितले होते. मी कुठेही अश्लील बोललेलो नाही, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असल्याचे खडसे यांनी सांगितले होते.