अखेर खोदाईस आयुक्तांची मान्यता

0

पुणे : पुणेकरांना चोवीस तास पाणी देण्यासाठी महापालिकेकडून तब्बल 2,500 कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणार्‍या समान पाणीपुरवठा योजनेच्या खोदाईस अखेर मुर्हूत सापडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेसाठीच्या रस्ते खोदाईमुळे पुणेकरांना त्रास झाल्यास त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची भीती व्यक्त करत या खोदाईस मान्यता दिली जात नव्हती. मात्र, अखेर महापालिका आयुक्तांनी त्यास मान्यता दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

शहरात 24 तास समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांच्या कामांना दोन वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. शहरात 82 ठिकाणी टाक्या उभारण्यात येणार असून त्यापैकी 8 टाक्यांचे काम पूर्णही झाले आहे. या कामासाठी शहरातील एकूण 2,100 किमीपैकी जवळपास 1,800 किमी रस्त्यांची खोदाई केली जाणार आहे.टाक्यांचे काम सुरू झाल्यानंतर खोदाईचे काम सुरू होणार आहे. कंपनीने मोठ्या जलवाहिन्यांसाठी सुमारे 108 किमी, सुमारे 250 किमीच्या जलवाहिन्यांसाठी खोदाईचा आराखडा सादर केला आहे. मात्र, त्यास मान्यता देण्यास प्रशासन तयार नव्हते. पक्षनेत्यांनी खोदाई धोरण मंजूर केले नसल्याने प्रशासनाने मान्यता दिल्यास अडचण नको, म्हणून पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा केली.