हिंजवडी : ‘आयटी पार्क’ म्हणून जगभरात नावारुपास आलेल्या हिंजवडी परिसरात असलेल्या गवारेवाडी, माण येथे जागेअभावी स्मशानभूमीच नव्हती. त्यामुळे मृतदेहांवर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत होती. स्मशानभूमीसाठी येथील नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. परंतु त्यांच्या मागणीची प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. परंतु, गवारेवाडी, माण येथील रहिवासी असलेले परमेश्वर बाळासाहेब गवारे (वय 32) यांचे ÷अल्पशा आजाराने निधन झाले. येथे स्मशानभूमी नसल्याने त्यांच्यावर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले. ही बाब प्रसारमाध्यमांनी समोर आणून उचलून धरली. त्यामुळे शेवटी प्रशासनाला जाग आली. गवारेवाडीसाठी स्मशानभूमी बांधण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेचे मोजमाप करण्यात आले असून, लवकरच स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
एमआयडीसीकडून जागेचा ताबा
याविषयी माणच्या सरपंच स्मिता भोसले म्हणाल्या की, स्मशानभूमीच्या जागेसाठी आम्हाला केवळ एमआयडीसीतर्फे तोंडी जागा दिल्याचे बोलले जात होते. मात्र, कागदोपत्री जागा कोणती व किती, याचे कोणतेच प्रमाण आमच्या हाती नव्हते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, एमआयडीसीने अधिकृतरित्या जागेचा ताबा दिला आहे. त्यानुसार स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात झाली आहे. 15 दिवसात तेथे अंत्यविधीकरण्याची सोयही करण्यात येईल, असे स्मिता भोसले यांनी सांगितले.
विषय लागला मार्गी
हिंजवडीपासून माण गावची स्मशानभूमी सहा किलोमीटर अंतरावर आहे. तर भोईरवाडीची स्मशानभूमी चार किलोमीटर लांब आहे. कोणाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी इतक्या लांब घेऊन जाणे शक्य होत नसल्याने लोक रस्त्यावरच अंत्यसंस्कार उरकून घेत होते. प्रशासन मात्र, थंडपणे पाहत बसण्याशिवाय काहीही कृती करत नव्हते. मात्र, आता हा विषय मार्गी लागला असून, ही समस्या दूर होणार आहे.
अग्निशामक दल केंद्राजवळ मिळाली जागा
याविषयी माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर भोईर म्हणाले की, खरे पाहता 2006 सालीच आम्हाला जागा एमआयडीसीने दिली होती. मात्र, मुळात ताबा हाती आला नव्हता. तसेच काही स्थानिक विरोधही झाला. त्यामुळे नेमकी जागा कोणती यामध्येही स्मशानभूमी अडकली होती. हा प्रश्न जुनाच आहे. लोकसंख्या वाढली तशी गेल्या दोन वर्षांपासून ही समस्या जाणवत होती. एमआयडीसीने अग्निशामक दल केंद्राजवळ पाच गुंठे जागा दिली आहे. तेथे कामाला सुरुवातही केली. तसेच एमआयडीसीचे प्रशासकीय अधिकारीही जागेच्या पाहणीसाठी लवकरच गावाला भेट देणार आहेत. त्यामुळे लवकरच गावाला हक्काची स्मशानभूमी मिळणार आहे.