जेरुसलेम : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जेरुसलेमला इस्राइलची राजधानी म्हणून मान्यता दिली आहे. ट्रम्प यांनी आपल्या एका भाषणामधून जेरुसलेमला मान्यता दिल्यानंतर इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे आभार मानले आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर संयुक्त राष्ट्रांनी एक तातडीची बैठक बोलवली आहे.
व्हाईट हाउसमध्ये काल झालेल्या भाषणामध्ये ट्रम्प यांनी इस्राइल आणि अमेरिका यांच्या संबंधांवर प्रकाश टाकत, इस्राइलने गेल्या 70 वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीविषयी आनंद व्यक्त केला. तसेच, जेरुसलेमला इस्राइलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची वेळ आता आली असून जेरुसलेमला अमेरिकेचा पाठींबा आहे, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. तसेच हा एक अत्यंत ऐतिहासिक अशा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेरुसलेमला तीन हजार वर्षांचा इतिहास असून, ज्यू लोकांच्या या शहरांशी अनेक वर्षांचे संबंध आहेत. ट्रम्प यांनी जेरुसलेमला मान्यता देऊन या भागात शांतता प्रस्थापीठ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.