अखेर ट्रक मालकही पोलीसांच्या अटकेत

0

जळगाव । गुंगीचे औषध देवून कत्तलीसाठी औरंगाबादकडे जात असलेला 50 गुरांचा ट्रक 30 सप्टेंबरच्या मध्यरात्री एमआयडीसी पोलिसांनी उमाळा घाटात पकडला होता.
याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील तीन संशयिताना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. तिघे न्यायालयीन कोठडीत असून चौथा संशयित अर्थात ट्रक मालकासही अखेर सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीसांनी अटक केली.

मध्यप्रदेशातून संशयीत अटक
अजिंठा चौफुलीकडून औरंगाबादकडे 30 सप्टेंबर 2016 रोजी रात्री ट्रकमध्ये (क्र. आरजे-35-जीए-0329) कत्तलीसाठी गुरे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीसांनी कुसूंबा गावाजवळ ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला परंतू चालकाने ट्रक थांबविला नाही. चालक भरधाव वेगाने ट्रक घेवून चिंचोली मार्गे उमाळा फाटा कंडारी रोडने घेवून गेला. यादरम्यान चालकाने ट्रक एमको कंपनीजवळ उभा केला. अंधाराचा फायदा घेत सर्व संशयीत ट्रक सोडून पसार झाले होते. या प्रकरणातील संशयीत सलिम खॉ माम्मु खॉ (वय 35, रा. बोरदा, ता. जावरा, जि. रतलाम), अकबर खॉ मंजूर खॉ न्याहरगर (वय 30, रा. बोतलगंज, ता. मल्हारगड, जि. मन्सोर), शंकरलाल भवरलाल ठाकूर (वय 42, रा. मन्सोर, संजित नाका) यांना पोलिसांनी अटक केली होती. हे तिघे संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. तर पोलीस ट्रक मालकाचा शोध घेत असतांना त्याची माहिती मिळाली. यानंतर एमआयडीसी पोलीसांनी ट्रक मालक सईद फारूख लक्कड (वय-26 रा. मुलतानपुरा जि. मन्सोर) याला मध्यप्रदेश राज्यातून सोमवारी अटक केली असून त्याची पोलीसांकडून कसून चौकशी सुरू आहे.