बावधन । बावधन येथील त्रिमूर्ती चौक ते एलएमडी चौकादरम्यानच्या डीपी रोडच्या रुंदीकरणाचा मार्ग अखेर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक दिलीप वेडे-पाटील व शहर सुधारणा समिती उपाध्यक्ष किरण दगडे-पाटील यांच्या प्रयत्नाने मोकळा झाला.
या रस्त्याबाबत मारुती बाबूराव अंबिलवादे यांनी सहकार्याची भूमिका घेऊन स.नं. 18/7 मधील स्वत:च्या मालकीचे 01 आर हे संपूर्ण क्षेत्र घरासह पालिकेच्या ताब्यात दिले. या वेळी जेसीबीच्या साह्याने हे घर जमीनदोस्त करून हटविण्यात आले. हा रस्ता मोकळा झाल्याने या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप सोयीचे झाले आहे. घर खाली करण्यासाठी अंबिलवादे यांना त्यांच्या जागेचा योग्य मोबदला मिळण्याची व त्यांची दुसर्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. या वेळी अंबिलवादे, त्यांची पत्नी व मुलाचा नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील, नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक व अल्पना वरपे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पोशाख देऊन सत्कार करण्यात आला. येथील रहिवासी अभिनेते विक्रम गोखले यांनी हा प्रश्न सोडविल्याबद्दल अंबिलवादे, वेडे-पाटील व दगडे-पाटील यांचे अभिनंदन केले. सुमारे 35 वर्षांपूर्वी बांधलेले घर सोडताना अंबिलवादे कुटुंबीयांना गहिवरून आले व अश्रू अनावर झाले.
सर्व प्रकारे मदत करणार
माझ्या एका डोळ्यात दु:ख व दुसर्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत आहेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप सोयीचे व्हावे, यासाठी अंबिलवादे यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे सर्व नागरिकांच्या वतीने आभार मानतो. भविष्यातही अंबिलवादे व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारे वैयक्तिक मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
– किरण दगडे-पाटील, नगरसेवक
वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार
अंबिलवादे यांचे अर्धेअधिक आयुष्य या घरामध्ये गेले. हे घर सोडताना त्यांना जेवढे दु:ख आहे, तेवढेच दु:ख मला होत आहे. मात्र, दुसरीकडे गेली 20 वर्षे बावधन परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेला वाहतूककोंडीचा प्रश्न हे घर हटविल्यामुळे सुटणार आहे.
– दिलीप वेडे-पाटील, नगरसेवक