अखेर तलासरी बसस्थानकाचे उद्घाटन

0

अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे तलासरी बस डेपोचे काम अनेक वर्षे रेंगाळले; दोन वर्षांनंतर उद्घाटन

जिल्ह्यातील तरुणांसाठी चालक प्रशिक्षण पालघर येथे उभे करणार असल्याचे सवरांचे प्रतिपादन

सुरेश वळवी-तलासरी। तलासरी तालुक्यात बस डेपो बनवण्यात यावा ही तालुक्यातील आदिवासी बांधवांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यामुळे तलासरी येथे 1986 मध्ये गणेशभाई पटेल यांची 2.71 हेक्टर जागा घेऊन कंपाउंड बांधण्यात आले होते. तालुक्यात बस डेपो बनणार या आनंदात तलासरी भागातील आदिवासी बांधव होता पण त्यांच्या या आनंदावर विरजण पडले. बस डेपो बनविला जात नसल्याने, अधिकार्‍यांचा नाकर्तेपणा व उदासीन राजकारणी यामुळे तलासरी बस डेपोचे काम अनेक वर्षे रेंगाळले होते. तलासरी परिसरातील स्थानिक नागरिक आणि विविध वृत्त पत्रातून मांडलेल्या समस्यांमुळे तलासरी येथे फक्त बस स्थानक बांधण्याचे रा.प.महामंडळाने निश्‍चित केले. त्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासनाने 30 लाख निधी मंजूर केला. त्यामध्ये माहामंडळाने 5 लाख 77 हजार रुपये टाकून 2015 ला बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. दोन वर्षे उद्घाटनाविना रखडलेले बसस्थानक अखे शुक्रवारी आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सार्वजनिक मालमत्तेची आपणच जोपासना केली पाहिजे
तालुक्यातील आपल्या सार्वजनिक मालमत्तेची आपणच जोपासना, सर्व तलासरीकरांनी केली पाहिजे, त्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे, असे आमदार पास्कल धनारे यांनी प्रवासी आणि नागरिकांना सांगितले. या वेळी आमदार पास्कल धनारे, माजी खासदार लहणू कोम, तहसीलदार विशाल दोंडकर, विभाग नियंत्रण पालघर गायकवाड, डहाणू आगर व्यवस्थापक बेहरे, गटविकास अधिकारी राहुल धूम, सभापती सविता डावरे, मुख्य स्थापत्य अभियंता पोदार, कार्यकारी अभियंता कलगी, नगराध्यक्ष स्मिता वळवी, लुईस काकड, विनोद मेढा, अमित नहार, लक्ष्मण वरखंडे, डेपो ठेकेदार भावेश पटेल, अभियंता अहिरे, नागरिक, प्रवासी उपस्थित होते.

तलासरीच्या बसस्थानक उद्घाटनप्रश्‍नी बोलताना आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री यांनी, तलासरी तसे गुजरातला लागून आहे. 27 गावे 216 पाडे असून एसटीच्या 57 फेर्‍या 35 कि.मी. लांब डहाणू अगारातून होतात, सर्वसामान्य गोर गरिबांचे एसटी बस आधारस्तंभ आहे. जिल्ह्यातील तरुणांसाठी चालक प्रशिक्षण पालघर येथे उभे करणार असल्याची घोषणा पालकमंत्री सवरा यांनी केली.

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील तरुणाना त्याचा फायदा होईल. पालघर जिल्ह्याचा विकास प्रगतिपथावर आहे. जिल्ह्याबरोबर तालुक्याचाही विकास झाला पाहिजे याससाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत पर्टनच्या दृष्टीने अतिशय सुंदर परिसर असून त्याचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. गुजरात राज्य आणि दादरा नगर हवेलीच्या सीमेवर असलेल्या तलासरी येथील एसटी बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे याठिकाणी एसटी बसची वर्दळ वाढेल तसेच आदिवासी बांधवांसाठी व्यावसायिक गाळे बांधून दिले, तर तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.