तळोदा: कोरोनाची पार्श्वभूमी पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंडप टाकून येथील नगर पालिकेची सर्वसाधारण सभा पालिका आवारात आयोजित केली होती. मात्र, ती सभा रद्द करण्यात आली असल्याचे मुख्यधिकारी सपना वसावा यांनी सांगितले.सर्वसाधारण सभेत ५४ विषयावर चर्चा होऊन निर्णय होणार होते.
यावेळी सभास्थळी काँग्रेसचे गटनेते गौरव वाणी, प्रतोद संजय माळी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, सुभाष चौधरी, नगरसेविका अनिता परदेशी, कल्पना पाडवी उपस्थित होते.
यावेळी मुख्यधिकारी सपना वसावा यांना विरोधी पक्षचे गटनेता गौरव वाणी व प्रतोद संजय माळी यांनी सभा अचानक का रद्द करण्यात आली याबाबतीत प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. तर या बाबतीत मुख्यधिकारी सपना वसावा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पीठासीन अधिकारी अर्थात नगराध्यक्ष यांनी अपरिहार्य कारण सांगत सभा रद्द करण्याबाबत सूचना दिल्याने सभा रद्द करण्यात आली. काही दिवसांनी पुन्हा सभा होणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
चोख पोलीस बंदोबस्त
दरम्यान, पालिकेच्या सभेत वाद होईल, अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने नंदुरबारहुन अतिरिक्त पोलीस तुकडी मागविण्यात आली होती. तसेच स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक केदार आदी स्मारक चौक व पालिकेच्या परिसरात तळ ठोकून होते. शुक्रवारी आठवडे बाजाराचा दिवस तसेच पालिका सभा असल्याने शहरात वर्दळ वाढली होती. यावेळी स्वतः पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत बाजारात फेरफटका मारत बेशिस्त वाहन चालकाना सूचना देऊन कार्यवाही केली. पोलीस जीप, दंगा नियंत्रण पथक वाहन यामुळे वातावरणात काही काळ तणाव होता. मात्र, सभा रद्द झाल्याने तणाव तात्काळ निवळला.
मंडपात सभा
कोरोना आजाराचा प्रभाव पाहता सर्वसाधारण सभा मंडपात ठेवण्यात आली होती. प्रत्येक सदस्यसाठी वर्तुळात रंगवून खुर्ची ठेवून सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते.
शहरात उत्सुकता
सभेत काहीतरी वादंग होईल, अशी चर्चा असल्याने याबाबत राजकीय चर्चेला उत आला होता. मात्र, ऐनवेळी सभा तहकूब झाल्याने चर्चेस पुर्णविराम मिळाला.
अजेंडाबद्दल उत्सुकता
कोणत्या विषयांवर वादंग होणार आहे याची माहिती घेण्यासाठी अनेकांनी व्हाट्सअप्सच्या माध्यमातून सभेचा अजेंडा मागवून विषयांबद्दल माहिती जाणून घेतली. शहरात भाजपमधील अंतर्गत कलह बाबतीत चर्चा अनेक दिवसांपासून आहे. मात्र, तो अधिकच ताणला गेल्याचे दिसून आले.
सभेत काँग्रेसचे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांनी दिलेला तक्रार अर्ज तसेच बायो डिझेल पेट्रोल पंप ना हरकत दाखला, महेंद्र कलाल यांचा बियर बारसाठी ना हरकत दाखला मिळणेबाबत असे विषय होते. दरम्यान, यापैकी कोणत्या विषयावर वादंग होणार होता हा शोधाचा विषय आहे.
“सभेत असे काही विषय होते की ज्याने वादविवाद झाला असता, वाद अधिक वाढू नये, यासाठी आमदारांनी भाजपा नगरसेवक यांच्यात मध्यस्थी करून वाद मिटविण्यात आले. मात्र एकंदर परिस्थिती लक्षात घेता वादविवाद झाले असते म्हणून सभा तहकूब करण्यात आली.”
–अजय परदेशी
नगराध्यक्ष, तळोदा
“सभा तहकूब होणे दुर्दैवी आहे. आम्ही नेहमी विकास कामांना साथ दिली आहे. नगराध्यक्ष यांची मंजुरी असल्याने सभेत येणारे विषय अनधिकृत कसे होऊ शकतात. सभा न झाल्याने अनेक कामांना खीळ बसेल आणि कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता भविष्यात या कामांना निधी उपलब्ध होईलच याची काहीच शास्वती नाही.”
-गौरव वाणी
गटनेता, काँग्रेस
“गोपनीय माहितीनुसार सभा वादळी होऊ शकते अशी माहिती मिळाली होती. सभेत वादंग निर्माण झाले तर कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेता शहरात अतिरिक्त पोलीस मागविण्यात आले होते.”
– विक्रम कदम
पोलीस उपविभागीय अधिकारी, अक्कलकुवा.
महत्वाचे विषय रखडले
सभेत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार होती. शहराच्या विकासाच्या दृष्टीने ते अतिशय महत्वाचे विषय होते. मात्र, सभा तहकूब झाल्याने अनेक महत्वपूर्ण विषयांना ब्रेक लागला आहे. त्यात नगर परिषदेच्या मालकीच्या सर्व्हे नंबर २५/२ जागेवर बांधकाम करण्यात आलेल्या गाळ्यांचा सध्याच्या बाजार भावानुसार अधिमुल्य निश्चित करण्याकामी विचार विनिमय करण्यात येणार होता. पाणीपुरवठा विभागाकरिता पाईप लाईन दुरुस्ती, मोटरपंप दुरुस्ती, टीसीएल पावडर पुरवठा त्याचप्रमाणे चिनोदा चौफुलीपासून ते न. पा. हद्दीपावेतो आणि हातोडा रोडपासून ते न. पा. हद्दीपावेतो रस्ता रुंदीकरण, डिव्हायडर, फुटपाथ आदी काम करण्यासंदर्भात अतिक्रमण काढणे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील सुरक्षा उपकरण्यांचा खरेदीस मंजुरी देणे यांसारख्या अनेक महत्वपूर्ण विषयांवर सभेत चर्चा होऊन त्यांना मंजुरी मिळणार होती.
दरम्यान, आ. राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे सभेत नियमबाह्य विषय मंजूर करण्याबाबत माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी भाजपच्या काही नगरसेवकांवर दबाव आणला असून शहर अध्यक्ष योगेश चौधरी यांनी लेखी स्वरूपात याबाबत माहिती दिली असल्याने याबाबतीत नगरसेवकमध्ये भीतीचे वातावरण असून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उद्धवु नये, यासाठी पालिकेची सभा रद्द करावी, अशी मागणी केली होती.