नवी दिल्ली: नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती वाढल्यामुळे भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ताकत राफेलमुळे वाढले आहे. फ्रान्सहून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भारतात आलेली विमाने देशसेवेसाठी झेपावणार आहेत. उद्याचा दिवस भारतासाठी मोठा आहे. उद्या १० सप्टेंबरपासून अंबाला हवाई तळावर अधिकृतरित्या ही पाच विमाने कार्यरत होणार आहेत. भारतासाठी आणि हवाई दलासाठी हा क्षण खूप महत्वाचा असणार आहे. यासाठी मोठमोठे अधिकारी आणि मंत्री अंबाला विमानतळावर पोहोचणार आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सचे सशस्त्र सैन्याचे मंत्री फ्लोरेंन्स पार्ले देखील सहभागी होणार आहेत. दोन्ही नेते प्रमुख पाहुणे असणार आहेत.
याशिवाय सीडीएस बिपीन रावत, हवाई दल प्रमुख आरकेएस भदोरिया, सुरक्षा सचिव डॉ अजय कुमार, संरक्षण विभागाचे सचिव डॉ जी सतीश रेड्डी आणि डीआरडीओचे अध्यक्षदेखील येणार आहेत. तसेच संरक्षण मंत्रालयाचे अन्य अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. राफेल विमाने 27 जुलैरोजी भारतात आली होती. यानंतर इथे त्यांची चाचणी घेण्यात आली. आता ही पाच लढाऊ विमाने हवाई दलाच्या 17 वी स्क्वाड्रन ‘गोल्डन अॅरोज’ चा भाग बनणार आहेत. या प्रसंगी फ्रान्सच्या संरक्षण क्षेत्राचे एक मोठे प्रतिनिधी मंडळही भारतात येत आहे. यामध्ये राफेलची कंपनी दसॉल्ट एव्हीएशनचे अध्यक्ष एरिक ट्रैपियर, मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक बरनेंगर हे देखील आहेत.