नवी मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौर जयवंत सुतार यांच्या विभागातच भूमाफियांनी अनधिकृत बांधकामाचा धडाका लावला आहे ही बातमी दैनिक जनशक्तीमध्ये सोमवारच्या अंकात प्रसिद्ध झाली असता त्या बातमीची दखल घेत पालिका प्रशासनाने त्यावर तत्काळ कारवाई केली आहे.प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईने मात्र गावात खळबळ माजली आहे. इमारतीवर कारवाई जरी झाली असली तरी अद्याप भूमाफिया मोकाट असल्याने त्याच्यावरही तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे. एखाद्या अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली असता त्यावर पुन्हा बांधकाम करणे हा गुन्हा आहे. अशा भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्यात येतो. असे असतानाही अनेक वेळा गुन्हे दाखल होत नसल्याने भूमाफिया संधीचा फायदा घेऊन पुन्हा कोणाच्या तरी आशीर्वादाने पुन्हा अनधिकृत बांधकामे करतात. याचा फटका गोरगरीब रहिवाशांना पडत असल्याने यापुढे अशा भूमाफियांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हातोडा पडल्याने अनेकांचे लाखो रुपये पाण्यात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौर जयवंत सुतार यांच्या घरापासून काही अंतरावरच अनधिकृत इमारतीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होते. यापूर्वीही या ठिकाणी 2 मजली इमारत उभारण्यात आली होती, तर त्यातील काही घरांची बुकिंगही घेण्यात आली होती. त्याचवेळी त्यावर हातोडा पडल्याने अनेकांचे लाखो रुपये पाण्यात गेले. त्यानंतर पुन्हा भूमाफियाने डोके वर काढत त्याच इमारतीचे बांधकाम करायला सुरुवात केली. गेल्या अनेक महिन्यांपासून या इमारतीचे काम सुरू असून यातील काही दुकाने व घरे विक्रीसाठी तयार असल्याचे दिसून येत होते. याविषयी जनशक्तीमध्ये बातमी प्रसिद्ध होताच एकच खळबळ माजली आणि पालिकेने यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी सकाळी हातोडा मारला. या मोहिमेत 10 कामगारांसह अतिक्रमण विभागाकडील पोलीस बंदोबस्तात 2 पोकलेन, 1 जेसीबी, 1 टोइंग, 1 डंपर साहित्याचा वापर करण्यात आला.अशाच प्रकारच्या अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामविरोधी मोहिमा यापुढील काळात अधिक प्रभावीपणे सर्वच विभागांत सुरू राहणार आहेत.