जळगाव । एकाच क्रमांकाच्या दोन चारचाकी आढळुन आल्यामुळे मंगळवारी 25 जुलैला शहरात एकच खळबळ उडाली. यानंतर यातील एक चारचाकी मुळ मालकाकडून फायनान्स कंपनीने जप्त केल्यानंतर तीची चक्क विना रजिस्ट्रेशन विक्री झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. दरम्यान, याप्रकरणी आज शनिवारी बनावट नंबर प्लेट बाळगुन तसेच वाहनाची नोंदणी केली नसल्याने 1 लाख 72 हजार 751 रुपयांची शासनाची फसवणुक केली म्हणून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात आढळली होती कार
महाबळ परिसरात राहणारे याज्ञिक हे मंगळवारी दुपारी 3 वाजता दुचाकीने घराकडे जात असतांना पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर एमएच 19 बीव्ही 5535 क्रमांकाची चारचाकी (सफेद रंगाची) उभी असल्याचे दिसल्यानंतर आपल्या कारचा देखील हाच क्रमांक असल्याने गोंधळात पडलेल्या याज्ञिक यांनी घरी फोन करून चारचाकीचा क्रमांक विचारून खात्री केली होती. या प्रकरणात दुसरी चारचाकी नरेंद्र विठ्ठल वारके (रा.चंद्रप्रभा कॉलनी, रिंगरोड, जळगाव) यांच्या ताब्यात असल्याचे समोर आले.
यानंतर वारके यांना कारसह जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सखोल चौकशी केली असता कारची विना रजिट्रेशन विक्री झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी आज शनिवारी ऋषीकेश गोपाळ गरुड (रा. शेंदुर्णी), राजु रामदास महाजन (रा.जळगाव), निखील रमेश गोडांबे (रा.अहमदनगर) व नरेंद्र वारके यांनी संगनमत करून 6 जानेवारी 2014 पासून या वाहनाची कोणतीही नोंदणी न करता बनावट नंबर प्लेटने गाडी ताब्यात बाळगुन शासानाचा 1 लाख 72 हजार 751 रुपयांचा महसूल बुडवून शासनाची फसवणुक केली म्हणून त्यांच्याविरूध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन राठोड करीत आहेत.