अखेर ‘त्या’ जखमीचा पाचव्या दिवशी मृत्यू

0

जळगाव : अंत्यसंस्कारासाठी नाशिक येथून येणार्‍या भामरे दाम्पत्याच्या कारच्या भिषण अपघात झाला होता. या अपघातामुळे कारने पेट घेतला होता. यात तिन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले होते. जखमीस खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. गेल्या चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत त्या जखमीचा अखेर पाचव्या दिवशी पहाटे मृत्यू झाला. सुभाष मन्साराम भामरे (वय 55) असे मयत प्रौढाचे नाव आहे. सकाळी त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले.

कंटेनर व कारचा अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू
ज्ञानदेव नगरातील हिरामण वामन विसपुते (वय 80) यांचे शनिवारी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी त्यांची नाशिकमधील सिडको येथील पुतणी रजनी सुभाष भामरे (वय 48) या त्यांचे पती सुभाष मन्साराम भामरे (वय 55) भामरे यांचे व्याही पंडित यादव दुसाने (वय 52) हे कारने (क्र.एमएच-15-5355) जळगावला येत होते. बांभोरी येथील गिरणा नदीचा पूल पार केल्यानंतर आहुजानगर जवळ असलेल्या वाटिकाश्रमासमोर मुंबईकडे जाणार्‍या कंटेनरचे (क्र.एनएल-01/एल-5690) ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यावर आडवा झाला. त्याचवेळी समोरून येणार्‍या भामरे यांच्या कारवर कंटेनर आदळला. कारने क्षणात पेट घेतला. त्यामुळे कंटेनरलाही आग लागली. कारमधून सुभाष भामरे कसेबसे बाहेर निघाले. मात्र, ते गंभीर जखमी झाले; परंतु रजनी भामरे, पंडित यादव आणि कारचालकाला कारच्या बाहेर निघता आले नाही. त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर सुभाष भामरे यांना रात्रीच खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू असतांना मंगळवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सकाळी सुभाष भामरे यांच्या मृतदेहास जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.