नवी मुंबई । 2005 पासून वारली पाडा येथील घरकुलांचा सुरू असणारा वाद अखेर लोकनेते गणेश नाईक यांच्या मध्यस्थीने मिटला. 12 वर्षांपासून घरकुलांचा ताबा घेण्यास नकार देणार्या आदिवासींना अखेर 29 पात्र आदिवासींना घरकुलांचा ताबा देण्यात आला. 2005 पासून गेली 12 वर्षे प्रलंबित असलेला वारलीपाडा येथील आदिवासींच्या घराचा प्रश्न नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागला असून 29 आदिवासी कुटूंबांना तेथील नवीन घरांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.
आदिवासींच्या लढ्याला 12 वर्षानंतर मिळाले यश
वारलीपाडा येथील घरांचे बांधकाम मे 2004 मध्ये पूर्ण झाले होते, त्यानंतर 2005 साली माजी दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात होते, मात्र त्यावेळेस आदिवासींनी घरांचा आकार लहान असून खुरड्या सारखी नको म्हणत तब्बल बारा वर्षे घरांचा प्रश्न रखडून पडला होता. घरे ताब्यात घ्यावी यासाठी पालिके कडून अनेकदा नोटिसा देखील धाडल्या होत्या मात्र प्रत्येक वेळी प्रशासनाच्या नोटिसना धुडकावून लावल्या जात होत्या. अखेर पालिका प्रशासनाने येथील आदिवासीच्या प्राथमिक नागरी सुविधा देणे बंद करत प्रत्येक कुडाच्या झोपड्यांना पन्नास ते एक लाखा च्या घरात कर लावण्यात आला. त्यानंतर आदिवासींनी वाढीव कराबाबत पालिकेवर मोर्चा देखील काढला. त्यानंतर कुठे पालिकेने कर कमी केला, मात्र प्राथमिक सुविधा नसल्याने आदिवासींनी घरांचा ताबा आणखी काही दिवसांत घेण्याचे सुचविले. मात्र प्रशासाने घाई करत मंगळवारी पोलीस बंदोबस्त मध्ये घरांचा ताबा घेण्यास भाग पाडले आणि अखेर आदिवासींनी घरांचा ताबा घेतला.
गणेश नाईकांनी काढली समजूत
आदिवासी बांधवांनी गणेश नाईक यांच्याकडे न्यायाची मागणी केली. त्यांनी ज्या पात्र आदिवासींची नावे पालिकेच्या यादीत आहेत अशा 35 कुटुंबाचे स्थलांतर घरकुलात केले जाईल व उर्वरित 8 आदिवासी कुटुंबाचे पुनर्वसन केले जाईल असे सांगितले. कारवाईबाबत भूमिका स्पष्ट करताच अखेर आदिवासींनी घरांचा ताबा घेण्यास मान्य केले. स्थलांतरीत न झालेल्या कुटुंबासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरु असून पस्तीस हजार स्केअर मीटर जागेत योजना राबवली जाणार असल्याचे पालिका उपयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले.