बोपोडी सिग्नल चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरीस पुलास बांधला आहे पूल
पालकमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते लोकार्पण
पिंपरी-चिंचवड : बोपोडी सिग्नल चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरीस पुलास बांधण्यात आलेला पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाणारा पुल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आहे. यामुळे दापोडीतील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मोठी मदत होणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले.
दररोज असायच्या वाहनांच्या रांगा
पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक नगरीसोबतच मोठ्या उड्डाणपुलांचे आणि सुसज्ज वाहतूक व्यवस्था असलेले शहर म्हणूनही ओळख आहे. मात्र, पुणे शहराकडून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करतानाच नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. हॅरिस पुलावरील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रशस्त रस्त्यावरून वेगात येणार्या वाहनांना अरूंद असलेल्या बोपोडी सिग्नल चौकात ब्रेक लागतो. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी वर्दळीच्या काळात सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत म्हणजे दापोडी- फुगेवाडी आणि खडकी, वाकडेवाडीपर्यंत वाहने अडकून पडत होती. खडकी बाजारातही वाहनांच्या लांबपर्यंत रांगा निर्माण होतात.
उद्घाटनावरून रंगले राजकारण
ही कोंडी सोडविण्यासाठी हॅरीस पुलाला समांतर दोन पुले बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात त्या कामास 2016 मध्ये सुरूवात झाली. दोन्ही महापालिकांनी या पुलाच्या कामाचा खर्च उचलला आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका मिळून एकूण 22 कोटी 50 लाख रूपये खर्च करणार आहेत. पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाणार्या पुलाचे काम पुर्ण झाले होते. परंतु, उद्घाटनाअभावी हा पुल खुला करण्यात आला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधार्यांना वेळ नसल्याचा आरोप करत हा पुल वाहतुकीसाठी खुला केला होता. परंतु, सत्ताधार्यांनी दुसर्या दिवशी तो पुल बंद केला होता.
वाहतूक होईल सुरळीत
आमदार जगताप यांच्या हस्ते हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे दापोडीतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल. सध्या अस्तित्वात असलेल्या आरसीसी पूलावरील पुण्याला जाणार्या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. वाहतूक सुरळीत झाल्यामुळे इंधनाची देखील बचत होईल. तसेच वायुप्रदुषणात घट होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होणार आहे.
यांची होती उपस्थिती
उद्घाटनावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, ’ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका आशा शेंडगे, स्वाती काटे, माजी नगरसेवक विजय लांडे, प्रभाग समितीचे नामनिर्देशीत सदस्य अनिकेत काटे, संजय कणसे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राऊत, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, उपअभियंता विजय भोजने, आदी उपस्थित होते.