जळगाव । जळगाव शहराला पाणी पुरवठा करणार्या ब्रिटीश कालीन जुनी जीर्ण झाल्यानंतर त्या शेजारी कोट्यवधी रुपये खर्चून तब्बल 35 लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली. मात्र गेल्या 23 वर्षांपासून याचा वापरच न केल्याची माहिती दै. जनशक्तिने नुकतीच उघडकीस आणली होती. याची महापालिकेने गंभीर दखल घेतली असून माजी महापौर तथा सभागृह नेते ललित कोल्हे यांनी आज महापालिकेत बैठक घेत या टाकीतील तांत्रिक तुटी दूर करण्यासाठी शासनाला विशेष प्रस्ताव पाठविण्याबाबत चर्चा केली.
23 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पाण्याच्या टाकीची जोडणी चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याने याचा वापर होत नव्हता यावर दै. जनशक्तिने सलग तीन दिवस सविस्तर मालिका प्रकाशित करत उपाय योजनाही सुचविल्या होत्या. या कामासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात 25 कोटी रुपयांचे अनुदान प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव ते रद्द झाले. या टाकीतून पाणीपुरवठा करण्यासाठी काही दुरूस्त्या आवश्यक असून त्यासाठी 28 लाख 50 हजारांचा निधी आवश्यक आहे. सदरची रक्कम शंभर कोटी रुपयांच्या अनुदानातून देण्यात येणार असून यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती ललित कोल्हे यांनी दिली. दै. जनशक्तिने या विषयाला वाचा फोडल्याबद्दल त्यांनी जनशक्तिचे कौतुकदेखील केले.