वाडा । भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत वाडा तालुक्यातील गोर्हे हे गाव दत्तक घेतले आहे. असे असताना गेल्या पंधरा दिवसांपासून गोर्हे गावातील पाणीपुरवठा योजना बंद होती. त्यामुळे येथील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरत होती. यासंदर्भात दै. जनशक्तिमध्ये वाडा तालुक्यात पाण्यासाठी वणवण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच पंचायत समितीच पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायतीचे प्रशासन खडबडून जागे झाले. या अधिकारी व कर्मचार्यांची पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी एकच धावपळ उडाली. दिवस-रात्र प्रयत्न करून प्रशासनाने तातडीने ही पाणी योजना सुरू केली. त्यामुळे गेले पंधरा दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागलेल्या येथील नागरिकांना अखेर पाणी मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
दै. जनशक्तिचे मानले आभार
विशेष म्हणजे गोर्हे या गावाची नळ पाणीपुरवठा योजना गोर्हे व देवळी या दोन गावांना पाणीपुरवठा करत असून, जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावाला पाणीपुरवठा योजनेची मोटार नादुरुस्तीचे कारण पुढे करून गेल्या पंधरा दिवसांपासून दोन्ही गावांतील पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना विशेष करून महिलांना खूप त्रास सहन करावा लागला. मात्र, 15 नोव्हेंबर रोजी दै. जनशक्ति या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्याने प्रशासन व्यवस्थेला जाग येऊन पाणी योजना सुरळीत केल्यामुळे येथील नागरिकांनी दै. जनशक्तिचे आभार मानले.