राज्यातील 92 नगरपालिकांसह चार नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्ट रोजी निवडणूक

आजपासून आचारसंहिता जारी ः 18 ऑगस्ट रोजी होणार मतदान ः दुसर्‍या दिवशी 19 रोजी मतमोजणी

मुंबई : राज्यात केव्हाही निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 18 ऑगस्ट रोजी मतदान तर 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असून निवडणुकीसाठीची आचारसंहिता जारी झाली आहे. दरम्यान, आदेश आल्यानंतर ठिकठिकाणचे पालिका व पोलिस प्रशासन कामाला लागले आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करतील. 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरली जातील तर छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर होईल शिवाय 4 ऑगस्टपर्यंत अर्ज माघारी घेता येतील. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच दरम्यान मतदान घेतले जाणार आहे. लगेच दुसर्‍यया दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी जाहीर होईल.

प्रचारासाठी केवळ दोन आठवड्यांचा कालावधी
अर्ज माघारी घेणे व प्रत्यक्ष मतदान यात 14 दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला असल्याने ती एक नवीन बाब ठरणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार याद्यांची निश्चिती झालेली असून त्या मतदार याद्यानुसारच आता मतदान प्रक्रियापार पडणार आहे.