अखेर पाऊस आला, मान्सून केरळात दाखल झाला!

0

नवी दिल्ली । पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणार्‍या देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. भारताच्या प्रवेशद्वारातून मान्सूनने आगमन केले आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला आहे. काही तासातच मान्सून देवभूमी अर्थातच केरळमध्ये वर्दी देईल, असा अंदाज नुकताच हवामान विभागाने वर्तवला होता. तो अंदाज खरा ठरला. केरळमध्ये पाऊस येण्यास पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती पाहता आजच मान्सून केरळमध्ये दाखल झाला.

उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना आणि पावसाची चातकाप्रमाणे वाट पहत असलेल्या बळीराजाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आता राज्यात सर्वदूर पावसाचे आगमन कधी होईल, याची बळीराजा वाट पाहत आहे. दरम्यान, मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात मोरा नावाचे चक्रीवादळ तयार झाल्यामुळे केरळ आणि ईशान्य भारतात मान्सून लवकर येण्यासाठी फायदाच झाला आहे. ईशान्य भारतातही त्यामुळे चांगला पाऊस होणार आहे.

मान्सून आज केरळच्या समुद्रकिनारी पोहोचला आणि पुढील 24 तासात केरळच्या बहुतांश भागात तसेच तामिळनाडूमध्ये दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील काही तासात मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागार परिसरात होईल.

रायगडमध्येही मान्सूनपूर्व सरी
केरळात आज मान्सून दाखल झाला असतानाच रायगड जिल्ह्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्यात. रायगडच्या पनवेल, उरण परिसरातही रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर दिवेआगारमध्ये सकाळी पाऊस झाला. त्याचप्रमाणे अलिबाग, रोहा आणि पेणमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच अंबरनाथमध्ये मान्सूनपूर्वच्या सरी बरसल्या, त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्यांची चांगलीच तारांबळ झाली. तर तिकडे तळकोकणातही वरुणराजा मुसळधार बरसतोय. सिंधुदुर्गात मान्सूनपूर्वच्या जोरदार सरींनी झोडपून काढले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही मान्सून वेगाने दाखल होईल अशी चिन्हे आहेत. 2, 3 आणि 4 जून रोजी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. शिवाय यावर्षी राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस होईल, असेही साबळे यांनी म्हटले आहे.