कराची : पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दवाचा म्होरक्या हाफिज सईद हा दहशतवादी आहे, असे अप्रत्यक्षरित्या मान्य केले आहे. हाफिज सईदची नोंदणी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत (एटीए) करण्यात आली आहे. त्यामुळे तो एक दहशतवादी आहे याची कबुलीच पंजाब सरकारने दिली आहे. हाफिज सईद आणि त्याचा सहयोगी काजी काशिफ यांच्या दोघांची नावे एटीएच्या यादीमध्ये चौथ्या परिशिष्टात टाकण्यात आली आहेत. याबरोबरच अब्दुल्ला ओबैद, जफर इकबाल, अब्दुर रहमान, आबिद यांची नावे देखील या यादीमध्ये टाकण्यात आली आहेत. एटीएच्या यादीमध्ये जर एखाद्याच्या नावाचा समावेश झाला तर ती व्यक्ती कुठल्या ना कुठल्या रुपाने दहशतवादाशी संबंधित आहे असा अर्थ काढला जातो. हाफिज सईद आणि त्याच्या साथीदारांना एटीएच्या यादीमध्ये टाकून पंजाब सरकारने ही कबुली दिली आहे.