अखेर पिंपळी लिमटेकवासीयांनी उपोषण घेतले मागे

0

बारामती । बारामती येथील पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराबाबत सुरू असलेले उपोषण जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत पिंपळी, लिमटेक यांनी सादर केलेल्या तक्रार अर्जाची जिल्हा परिषद कार्यालयामार्फत येत्या दहा दिवसात कसून चौकशी करण्यात येणार आहे. सदरच्या चौकशी अहवालातील मुद्दयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन लेखी पत्रात स्पष्टपणे दिले आहेत.

पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीत गैरव्यवहार झाल्याच्या निषेधार्थ बारामती पंचायत समिती शेजारी गेल्या 35 दिवसांपासून ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. या गैरव्यवहार प्रकरणी पंचायत समितीने स्पष्ट स्वरुपात खुलासे न करता मोघम स्वरुपात लेखी पत्र देण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे हे उपोषण लांबले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते शुक्रवारी बारामती येथे आले होते. परंतु त्यांनी उपोषणकर्त्यांना भेटण्याचे टाळले. ही बाब एका सामान्य नागरीकाने पंचायत समिती सदस्याच्या निदर्शनास आणून दिली. मग या सदस्याने अध्यक्षांना फोन करून उपोषणाबाबत कळविले तेव्हा अध्यक्ष गुणवडीच्या पुढे निघून गेले होते. ही गंभीर बाब वृत्तपत्रांना कळू नये म्हणून अध्यक्ष तेथून पुन्हा माघारी फिरले आणि त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

दहा दिवसात चौकशी अहवाल
उपोषणकर्त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवकाते यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र लेखी आश्‍वासनाशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही. अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली. यावर अध्यक्षांनी जिल्हापरिषदेतील उपमुख्यकार्यकारी अधिकारी कोहीनकर यांच्याशी चर्चा केली. कोहीनकर यांनी 20 दिवसांचा अवधी मागितला. मात्र उपोषणकर्त्यांनी या अवधीची गरज नसल्याचे स्पष्ट करून अवघ्या दोन दिवसात ही चौकशी होऊ शकते व संबंधितावर कारवाई करता येईल, असे सांगितले. पुन्हा यावर चर्चा होऊन हा कालावधी दहा दिवसांचा करण्यात आला. रात्री 8 वाजता पंचायत समितीत चर्चा होऊन 10 दिवसाचा कालावधी मान्य करण्यात आला व उपोषण मागे घेण्यात आले.