…अखेर फिदाअली पंपाची जागा चर्चच्या ताब्यात

0

धुळे । शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फिदाअली पेट्रोल पंपाची जागा अखेरीस आज चर्च पदाधिकार्‍यांनी न्यायालय बेलिफाच्या उपस्थितीत ताब्यात घेतली. लगेचच या जागेला तारेचे कुुंपन करण्यात आले आहे. शहरातील राजवाडे संशोधन मंडळासमोर फिदाअली पेट्रोल पंप आहे तर पश्‍चिमेकडून पूर्वेकडे काही दुकानांचे बांधकाम करण्यात आले आहे. ही सर्व जागा संत अ‍ॅन कॅथॉलिक चर्च यांच्या मालकीची असून चर्चचे फादर यांनी या जागेचा व्यावसायिक करार संपल्याने ती चर्चला परत करावी, अशी मागणी केली होती. तथापि फिदाअली पेट्रोल पंपच्या मालकांनी जागा परत करण्याऐवजी न्यायालयात दाद मागितली होती.

बरीच वर्षे हा वाद न्यायालयात चालल्यानंतर अखेरीस न्यायालयाने चर्चच्या बाजूने निकाल देत चर्चला जागा परत करावी असा निर्णय जिल्हास्तरावरील न्यायालयाने दिला होता. मात्र उच्च न्यायालयात अपिल करुन जागा परतीस फिदाअली पेट्रोल पंपच्या मालकांनी नकार दिला होता. अखेरीस आज सकाळी 11 वाजता न्यायालय बेलिफाच्या उपस्थितीत चर्चचे फादर रॉड्रीक्स, मॅन्युअल मकासरे यांनी पेट्रोल पंपची जागा ताब्यात घेतली. शिवाय लगोलग या जागेला तारेचे कुंपन घालून ती जागा संरक्षितही केली. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती. यावेळी वाद होवू नये म्हणून पोलिसही उपस्थित होते.