अखेर फेसबुकडून भाजप नेत्यांच्या पोस्ट डिलीट

0

नवी दिल्ली: भाजपचे काही नेते समाज माध्यमातून विशेषत: फेसबुकवरून समाज भावना भडकेल अशी पोस्ट शेअर करतात. मात्र फेसबुककडून त्यांच्यावर कारवाई होत नाही. आक्षेपार्ह वक्तव्य फेसबुक हटविते, मात्र भाजपशी लागेबांधे असल्याने फेसबुक भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह पोस्ट हटवित नाही असे आरोप झाल्यानंतर अखेर फेसबुकने कार्यवाही केली असून भाजप नेते टी. राजा सिंह आणि आनंद हेगडे \यांच्या काही पोस्ट हटवल्या आहेत. फेसबुकच्या निष्पक्षतेवर द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. फेसबुकने भाजप नेत्यांच्या ‘हेट स्पीच’ असलेल्ा पोस्टविरोधात कारवाई करण्यास फेसबुक जाणून बुजून कुचराई करत आहे असे जर्नलने म्हटले होते.

भाजप नेत्यांच्या पोस्ट हटवल्यास फेसबुकच्या भारतातील व्यवसायावर मोठा परिणाम होईल, असे फेसबुक इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आंखी दास यांनी म्हटल्याचा दावा जर्नलच्या वृत्तात करण्यात आला आहे. फेसबुकसाठी यूजर्सच्या दृष्टीने भारत हा सर्वात मोठा बाजार आहे. या वृत्तात टी. राजा सिंह यांच्या एका पोस्टचा हवाला देण्यात आला होता. यात कथित रुपात अल्पसंख्याकांविरोधातील हिंसेचे समर्थन करण्यात आले होते. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, धोकादायक व्यक्ती आणि संस्थांबाबतच्या धोरणानुसार राजा यांना बॅन केले गेले पाहिजे, असे फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी ठरवले होते.