पुणे । सर्वात ताकतवर मानला जाणारा आणि चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघाच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आल्या आहेत. पुण्यात झालेल्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने भेदक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघावर 61 धावांनी दणदणीत मात करत त्यांचा पत्ता कट केला आहे. गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्यापुढे बंगळुरु संघाच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. पुणे संघाने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुसमोर 158 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला बंगळुरु संघ 100 धावाही करू शकला नाही. कर्णधार कोहलीने एकाकी संघर्ष करत अर्धशतकी खेळी केली मात्र तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.
स्मिथ, त्रिपाठी, तिवारीच्या खेळीच्या बळावर पुण्याचे 158 धावांचे आव्हान
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या पुण्याची सुरुवात आजही चांगली झाली नाही. रहाणे वैयक्तिक 6 धावांवर बद्रीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर स्मिथ मैदानावर आणि त्रिपाठीने चांगली भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. नेगीने त्रिपाठीला झेलबाद करून पुणे संघाला दुसरा झटका दिला. त्रिपाठीने 37 धावा केल्या. कर्णधार स्मिथने तुफान फटकेबाजी करत पुण्याला चांगली धावसंख्या उभारण्यात मदत केली. स्मिथ घरच्या मैदानावर मोठी खेळी करील, असे वाटत असतानाच वैयक्तिक 45 धावांवर तो झेलबाद झाला. 3 बाद 108 धावा असताना महेंद्रसिंग धोनी मैदानात आला. त्याने सुरेख खेळ करत धावफलक हलता ठेवला. मनोज तिवारीने चांगली फटकेबाजी केली. मनोज तिवारीने 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 35 चेंडूंमध्ये 44 धावांची नाबाद खेळी केली. तर धोनीनेही एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 17 चेंडूंत 21 धावा केल्या. या दोघांनी 49 धावांची भागिदारी केली. त्यांच्या भागिदारीच्या जोरावर पुण्याच्या संघाने बंगळुरुसमोर 158 धावांचे आव्हान ठेवले.
शंभरच्या आत गुंडाळला डाव
पुण्याचे 158 धावांचे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या बंगळुरु संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. कोहलीसोबत सलामीला आलेला हेड स्वस्तात माघारी परतला. त्याने फक्त दोन धावा केल्या. डिव्हिलियर्स सुरुवातीपासूनच चाचपडत होता. फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर झेल देऊन तो तंबूत परतला. त्याने तीन धावा केल्या. डिव्हिलियर्सनंतर केदार जाधव धावबाद झाला. कर्णधार एका बाजूने खिंड लढवत असला तरी, त्याचे सहकारी तंबूत परतत होते. संघाच्या 48 धावा असताना निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर बंगळुरुचा एकही फलंदाज अधिक वेळ मैदानावर तग धरू शकला नाही. कोहली अर्धशतकी (55) खेळी करून झेलबाद झाला. बंगळुरुला अवघ्या 96 धावाच करता आल्या. पुण्याकडून ताहीरने 3, फर्गुसनने 2 तर, सुंदर, ख्रीचीयन, उदांकटने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.