…अखेर मनपा कर्जमुक्त

0

कर्जापोटी 254 कोटी रक्कम हुडकोच्या खात्यात वर्ग

जळगाव- तत्कालीन जळगाव नपाने हुडकोकडून घेतलेल्या एकरकमी कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.त्यानुसार मनपाने शुक्रवारी 253 कोटी 83 लाख 38 हजारांची रक्कम आरटीजीएस पध्दतीने हुडकोच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.त्यामुळे मनपा आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे.
घरकुलसह विविध योजनांसाठी तत्कालीन नपाने हुडकोकडून 141 कोटी 32 लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्जाचे काही हप्ते थकविल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला होता.त्यामुळे हुडकोने डीआरटीत धाव घेतली होती.त्यानंतर डीआरटीने 341 कोटींची डिक्री नोटीस बजावली होती.दोन वेळा मनपाचे बँक खाते गोठविण्याची नामुष्की देखील ओढवली होती.त्यानंतर जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन,आ.राजूमामा भोळे यांनी एकरकमी कर्जफेडीसाठी मुख्यमंत्र्यांकड पाठपुरावा केला.त्यानुसार कर्जफेडीचा निर्णय घेण्यात आला.मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे कर्जफेडीसाठी शासनाकडून 250 कोटी 83 लाख 38 हजार इतकी रक्कम मनपाला प्राप्त झाली. त्यानंतर शुक्रवारी मनपा प्रशासनाने 253 कोटी 83 लाख 38 हजारांची रक्कम आरटीजीएस पध्दतीने हुडकोच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती महापौर सीमा भोळे यांनी दिली. दरम्यान,हुडक ोच्या कर्जाची रक्कम अदा केल्यामुळे आता मनपा खर्‍याअर्थाने कर्जमुक्त झाली आहे.