मुंबई । ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरींना अखेर सरकारकडून न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आपले आश्वासन पूर्ण करत त्यांची डीवायएसपी अर्थात पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती केली आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2016 मध्ये जाहीर केले होते. हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2016 मध्ये विधानसभेत विजय चौधरींचे अभिनंदन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली होती.
मंत्रालयाच्या चकरा मारून थकले होते चौधरी
विजय चौधरींना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. त्यामुळे कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरींनी नोकरी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र अनेक महिने उलटूनही विजय चौधरींना सरकारी नोकरी मिळत नव्हती. मंत्रालयाच्या चकरा मारूनही त्यांच्या पदरी अपयश येत होते. त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती. पण आता अखेर त्यांना नोकरी मिळाली आहे.