अखेर मुंबई , पुणे , नाशिक येथून तज्ञांचे पथक आज सारंगखेडाला येवून पुळचा पडझड झालेल्या भागाची पाहणी

शहादा, ता. 20: अखेर मुंबई , पुणे , नाशिक येथून तज्ञांचे पथक आज सारंगखेडाला येवून पुळचा पडझड झालेल्या भागाची पाहणी केली. माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांनी काल मंगळवारी केंद्रीय मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे याबाबतची सविस्तर माहीती देऊन तत्काळ पुलाचे कामाला सुरवात करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पथक तत्काळ येथे दाखल झाले.

दरम्यान एवढी मोठी घटना घडूनही या भागाचे कोणतेही लोकप्रतिनिधी किंवा जिल्हाधिकारी यांनी भेट दिली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

17 सप्टेंबरला सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाचे भराव खचल्याने पुलाचे तीन गाळ्यांना प्रत्येकी 8 मीटर लांब व अडीच मीटर रुंदीचे भगदाड पडले. सुदैवाने ही घटना दिवसा घडल्याने कोणतीही जीवित किंवा आर्थिक हानी झाली नाही. मात्र गत चार दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही वाहतूक नंदुरबार व शिरपूर मार्गे वळविण्यात आलेली आहे. पुलाला भगदाड पडल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. काल राष्ट्रीय महामार्गच्या धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत शेलार यांनी पाहणी करीत ड्रोनद्वारे फोटो काढीत नाशिक व मुंबईच्या वरिष्ठ कार्यालयांना पाठविले होते. दरम्यान या घटनेची माहिती घेत माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचेशी सखोल चर्चा करीत पुलाची दुरुस्ती तत्काळ करणेबाबत विनंती केली. त्यानुसार आज (दि. २०) सकाळी दहाच्या सुमारास पुलाची व परिस्थितीची पाहणी तसेच उपाययोजना करण्यासाठी मुंबई, पुणे व नाशिक येथील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट देऊन पुलाची पाहणी केली.

 

या पथकात राष्ट्रीय महामार्ग विभाग मुंबईचे मुख्य अभियंता संतोष शेखर, अधीक्षक अभियंता दयानंद विभुते, पुणे येथील पुल संकल्प वित्त मंडळाचे मुख्य अभियंता श्री. रामगुडे, राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत शेलार, शहाद्याचे उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्या समावेश होता. या अधिकाऱ्यांनी पुलाला ज्या ठिकाणी भगदाड पडलेले होते शिवाय भराव खचलेला होता त्याची पूर्ण पाहणी केली. पुलाच्या खाली जाऊन भरावाची व पुलाची पाहणी करून तांत्रिक अडचणी समजून घेतल्या. नेमका पुलाच्या भराव कसा खचला तसेच पुलाचे तीन गाळ्यांना भगदाड पडले हा त्यांच्या दृष्टीने संशोधनाच्या विषय ठरला. पुलाची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पथकाची दोंडाईचा येथे जाऊन तेथील विश्रामगृहात स्वतंत्र बैठक झाली. यात पुलाच्या परिस्थितीची सखोल चर्चा झाली.

 

दरम्यान या चार दिवसात बांधकाम विभागातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पथक उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनेची दाखल घेत पाहणी केली. मात्र, नागरिकांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा विषय असताना अद्याप जबाबदार लोकप्रतिनिधी यांना पाहणी करण्यासाठी वेळ मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी फक्त दूरध्नीद्वारे माहिती घेत वाहतूक वळविण्याचा सूचना दिल्यात मात्र त्यांनाही सारंगखेडा याठे येण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येते.

 

चौकट:

सारंगखेडा येथील पुलाचा उर्वरित भाग सुव्यवस्थित आहे. पुलाची संपूर्ण पाहणी केली. तीन गाळ्यांपर्यंत भगदाड कसे पडले याची तांत्रिक माहिती घेतली जाईल. दुरुस्ती कशी लवकर केली जाईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक ते दीड महिन्यात पुल वाहतुकीसाठी पुर्ववत सुरू केला जाईल. दोन दिवसात लागलीच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल. बॅरेजचा पुलावरून वाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही.

अनंत शेलार कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धुळे विभाग